निशिगंधा गवळी (आहारतज्ज्ञ)उन्हाळा सुरू झाला की गारेगार-थंड-रसरशीत खावेसे वाटते.अनेकांची पचनशक्तीही कमी होते. नेहमीची भाजी-पोळी खाण्याची इच्छाच होत नाही.जीव पाणीपाणी करतो. सतत पाणी पिऊनही पोट डब्ब होते.उन्हातान्हात फिरतीचे काम असेल तर सतत पाणी, सरबतं पिऊनही आजारपण येते कारण दूषित पाण्याने होणारे आजारही याकाळात बळवतात.एसीत बसून काम करणारे पाणी कमी पितात आणि अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास याच काळात सुरू होतो.
म्हणजे रणरणत्या उन्हात तब्येत सांभाळण्याला पर्याय नाही.एकतर तब्येतही सांभाळायला हवी आणि दुसरीकडे थंड-चविष्ट पण पचायला हलकं असंही खायला हवं.त्यात मुलांच्या परीक्षा, पुढे उन्हाळी सुटी... काहीतरी ‘वेगळं’ कर खायला कर हा हट्ट सुरू होणारच...
(Image : google)
गारेगार आणि पौष्टिक?
१. उन्हाळ्यात गारेगार खावंसं वाटतं पण गार म्हणून आपण नक्की काय खातो याकडे लक्ष द्यायला हवं.२. येताजाता फ्रीजमधलं खूप गार पाणी पिणं टाळा त्यानं घसाही बिघडतो.३. ज्यात त्यात बर्फ घालून खाणंही योग्य नाही, घरी बर्फ केला तरी पाणी स्वच्छ असावंच पण ट्रेची स्वच्छता नीट ठेवायला हवी.४. सगळी सिझनल स्थानिक फळं खा. बोरं, करवंद, जांभळं, स्थानिक आंबे खा. फळांचा ज्यूस न पिता फळं खाणंच उत्तम.
५. मिल्कशेकही क्वचित प्या, त्यापेक्षा फक्त फळं खाणं उत्तम.६. पारंपरिक स्थानिक पदार्थ जसे की आंबिल, खिशी, सातूचे पीठ, दहीभात, ताक, मठ्ठा असे पदार्थ आहारात हवेच.७. विविध सरबतंही प्या. लिंबू, आवळा, कोकम सरबत योग्य.८. फॅन्सी गोष्टी न खातापिता, स्थानिक-पारंपरिक उन्हाळ्यातला आहार तब्येतीसाठी योग्य.