शुभा प्रभू साटम
उन्हाळा किती तापला आहे. पारा चढला आहे, भाजून काढतं आहे ऊन. त्यात उकाडा. जीव सारखा पाणी पाणी होतो. काही खावेसे वाटत नाही, सतत शीतपेयं पिणंही योग्य नाहीत. आणि सरबतं तरी किती पिणार? सारखं पाणी पिऊनही पोट डब्ब होतं. भूक लागत नाही. या साऱ्या तक्रारी आपल्या परिचयाचा आहे. खरं तर आपल्या पारंपरिक पाककृतीत हवामान आणि आहार यांचा उत्कृष्ट ताळमेळ साधलेला आहे पण हल्ली तो बराचसा विसरला गेलाय. आज त्यातलाच एक सोपा प्रकार पाहूया ज्वारी /बाजरी /नाचणी ची आंबील. ज्याला इंग्रजीत ब्रॉथ म्हणतात तसा हा प्रकार आहे. जाडसर पेय,भूक आणि तहान दोन्ही शमवण्यासाठी उत्तम. उन्हाळ्यात तर अगदी खास.
(Image : Google)
आंबील करायचं कसं?
ज्वारी/बाजरी/नाचणी यापैकी कोणतेही आपल्या आवडीचे पीठ घ्या. उन्हाळ्यात बाजरी उष्ण पडेल असे वाटत असेल तर नाचणी उत्तम. अनेकजणांना उन्हाळ्यात बाजरी खाल्ल्याने त्रास होतो. तर मग त्यावर उपाय म्हणून नाचणी म्हणजेच नागली किंवा ज्वारी हा पर्याय योग्य.
तर हे पीठ एक मध्यम वाटी
साधारण आंबट ताक पिठाच्या दुप्पट
आले,लसूण(ऐच्छिक), हिरवी मिरची
फोडणीसाठी जीरं/ हिंग
मीठ/साखर
कोथिंबीर
(Image : google)
कृती
कढईत तूप तापवून त्यात जिरे हिंग घालावा. आता तुम्हाला जे घालयाचेय ते म्हणजे लसूण मिरची आले हे सर्व बारीक चिरून घालावे.
किंचित परतून त्यात पीठ ,चांगलं परतून त्यात पाणी घालून भरभर ढवळून घट्ट शिजवून, कच्ची चव गेली पाहिजे,
हे पीठ गार करून त्यात ताक मीठ साखर कोथिंबीर घालून साधारण पातळ करून घ्यावे.
वैयक्तिक चवीनुसार मिरची लसूण यांचे प्रमाण ठरवावे
ही आंबील पोटाला थंड असतें, नाचणीची असेल तर फारच छान. उन्हाळ्यात पित्त त्रास होतो त्यांच्यासाठी ही आंबील गुणकारी.
महाराष्ट्रात तसेच कर्नाटक भागात ही खाल्ली/प्यायली जाते
विकतच्या साखर आणि रसायन असणाऱ्या गोष्टीऐवजी हे अस्सल देशी एनर्जी ड्रिंक कधीही उत्तम. पोटभरीचं.
(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)