Summer Special: उन्हाळ्यात भूक लागण्यापेक्षा तहान जास्त लागते. केवळ पाणी पिऊन ही तहान भागत नाही. सतत सरबतं पिणं ही देखील तहान भागवण्याची योग्य पध्दत नव्हे. खाण्याद्वारेदेखील तहान भागवता येते. यासाठी फ्रूट सॅलेड खाण्याचा पर्याय योग्य आहे. पण फ्रूट सॅलेड म्हणजे दुधात कस्टर्ड पावडर टाकून केलेलं नव्हे. फ्रूट सॅलेडद्वारे शरीराची पोषणाची गरज भागवली जाणं आवश्यक असतं. या फ्रूट सॅलेडद्वारे भूक भागून पोट शांत होतं आणि सॅलेडमधील पाण्याच्या प्रमाणामुळे पोटाला थंडावा देखील मिळतो.
Image: Google
उन्हाळ्यात बाजारात काकडी, आंबा, कैरी, खरबूज, टरबूज अशी विविध फळं भाज्या असतात. या फळं आणि भाज्यांचा उपयोग करुन विविध प्रकारचे पौष्टिक आणि स्वादिष्ट सॅलेड करता येतात. कलिंगड, काकडी आणि कैरीचे खास उन्हाळा स्पेशल सॅलेड करुन जिभेला आणि पोटाला संतुष्ट करता येतं. हे तीन प्रकारचे सॅलेड खाल्ल्यानं वजन नियंत्रित राहातं. उन्हाळ्यात कूल इफेक्ट देणारे फ्रूट सॅलेड तयार करण्यासाठी खूप काही गोष्टींची गरज नसते. कमी सामग्रीत सोप्या पध्दतीनण् फ्रूट सॅलेड करता येतं.
Image: Google
कलिंगडचं सॅलेड
कलिंगडमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं यामुळेच पोटाला थंडावा देण्यासाठी कलिंगडचं सॅलेड खाणं फायदेशीर ठरतं. कलिंगडचं सॅलेड करण्यासाठी 4 कप कलिंगडचे तुकडे, 2 काकड्या गोलाकार कापलेल्या, 1 लिंबाचा रस, चवीनुसार सैंधव मीठ, चाट मसाला, 2 कापलेले सफरचंद आणि संत्र्याच्या फोडी घ्याव्यात.
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात कापलेल्या कलिंगड, काकडी, सफरचंद आणि संत्र्याच्या फोडी मिसळून घ्याव्यात. त्यावर सैंधव मीठ, चाट मसाला घालून चांगला एकत्र करुन घ्यावा. शेवटी लिंबाचा रस घालून थोडा वेळ सॅलेड तसंच ठेवून नंतर ते खावं.
Image: Google
काकडीचं सॅलेड
उन्हाळ्यात थंडं प्रकृतीची काकडी आहारात असणं फायदेशीर असतं. काकडीत पाण्याचं प्रमाण भरपूर असल्यानं काकडीचं सॅलेड खाल्ल्यानं सारखी लागणारी तहान भागते. पोटही भरल्यासारखं राहून सतत भूक लागत नाही. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठीही काकडीच्या सॅलेडचा उपयोग होतो.
काकडीचं सॅलेड करण्यासाठी 2 काकडी, 1 लिंबू, थोडे भाजलेले जिरे आणि चवीनुसार मीठ घ्यावं.
सलाड करताना काकडी धुवून पुसून घ्यावी. काकडीची सालं हलक्या हातानं काढून घ्यावी.काकडी गोलाकार कापावी. कापलेल्या काकडीवर भाजलेले जिरे, मीठ भुरभुरुन ते काकडीच्या फोडीत चांगलं मिसळून घ्यावं. शेवटी यात लिंबाचा रस घालून सॅलेड 5-7 मिनिट तसंच ठेवून मग खावं.
Image: Google
कैरीचं सॅलेड
कैरीचं सॅलेड तोंडास चव आणतं आणि शरीराला थंडावाही देतं. हे सॅलेड रिकाम्या पोटी खाऊ नये. काही खाल्लेलं असल्यानंतर कैरीचं सॅलेड खाल्ल्यास पोटात चमका येत नाहीत. कैरीचं सॅलेड करण्यासाठी 2 कप कापलेली कैरी, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, थोडा बारीक चिरलेला पुदिना, पाव कप लेट्यूसची बारीक चिरलेली पानं, 2 चमचे लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घ्यावं.
कैरीचं सॅलेड करताना आधी कैरी धुवून-पुसून सालं काढून घ्यावीत. काकडीच्या बारीक फोडी कराव्यात. कांदा -पुदिना कापून घ्यावा. लेट्युसची पानं धुवून-निथळून चिरुन घ्यावीत. कैरी, कांदा, पुदिना आणि लेट्यूस हे चांगलं एकत्र करुन घ्यावं. वरुन मीठ आणि लिंबाचा रस घालून सॅलेड नीट हलवून घ्यावं आणि खावं.