उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने आपल्याला सतत गारेगार काहीतरी खावेसे वाटते. अशावेळी आइस्क्रीम, बर्फाचा गोळा, ज्यूस यांचा आपण भडीमार करत असतो. यामुळे आपल्याला तात्पुरते बरे वाटते. पण पुन्हा लाहीलाही होतेच (Summer Special). तसेच या पदार्थांमधून कोणतेच पोषण मिळत नाही. आईस्क्रीम आपल्याला खायला गार लागत असले तरी ते तब्येतीसाठी उष्ण असते. तसेच या गार गोष्टींमुळे तब्येतीला त्रास व्हायचीही शक्यता असते. पण त्यापेक्षा अशावेळी गार दूध पिणे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. दुधाला आपल्याकडे पूर्णान्न म्हटले जाते. मूल जन्माला आल्यापासून आपण त्याला दूध देतो. दूधामुळे शरीराला प्रोटीन्स, कॅल्शियम आणि इतरही अनेक आवश्यक घटक मिळतात. मग उन्हाळ्यात सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री झोपताना गार दूध प्यायल्यास उकाडा सुसह्य तर होतोच पण उन्हामुळे आलेला थकवाही दूर होतो. हे दूध नुसतेच पिण्यापेक्षा त्यामध्ये काय घालून प्यायले तर त्याची पौष्टीकता अधिक वाढू शकेल याविषयी समजून घेऊया...
१. गुलकंद
गुलकंद हा उन्हाळ्यात आवर्जून खायला हवा. भारतातील पारंपरिक पदार्थांपैकी एक असणारा गुलकंद हा उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर अतिशय गुणकारी असतो. उन्हाळ्यात तापणारे शरीर थंड ठेवण्यासाठी गुलकंदाचा अतिशय चांगला उपयोग होतो. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या गुलकंदाचे आयुर्वेदात बरेच महत्त्व सांगितले आहे. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी गुलकंदाचा फायदा होतो. मात्र तो नुसता खाण्यापेक्षा दुधात घालून घेतल्यास जास्त फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात आपल्याला एकप्रकारचा थकवा आल्यासारखे होते. गुलकंद गोड असल्याने अशावेळी गुलकंद घातलेले दूध प्यायल्यास तरतरी येते.
२. तूप
हाडांची बळकटी वाढण्यासाठी दूध फायदेशीर असतेच पण त्यात तूप घातल्यास त्याचे पोषण आणखी वाढते. उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला गॅसेस, बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या तक्रारी भेडसावू शकतात. अशावेळी दूध आणि तूप हे मिश्रण अमृतासारखे काम करते. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे अॅसिडीटी होण्याचेही प्रमाण जास्त असते. मात्र अशावेळी दूध आणि तूप घेतल्यास ही समस्या कमी होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात शरीरातील ऊर्जा कमी झाल्यासारखे आणि थकल्यासारखे वाटते. अशावेळी दूध आणि तूप घेतल्यास त्वरीत ऊर्जा मिळण्यास मदत होते.
३. सब्जा
सब्जा हा उन्हाळ्यात अतिशय उपयुक्त असतो. सब्जा खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. हे सगळे घटक आरोग्याचे चांगले पोषण होण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. सब्जा खाल्ल्याने खाल्लेल्या अन्नाचे चांगले पोषण होते. याबरोबरच त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी सब्जा खाणे फायदेशीर ठरते. सब्जायुक्त दूधगरम पाण्यात सब्जा भिजवून रोज रोत्री दुधासोबत घेतल्याने फायदा होतो. सब्जामुळे गॅससंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. पोटातील जळजळ, अॅसिडिटी कमी करण्यासही मदत होते. प्यायल्यास आपल्याला वारंवार भूक लागत नाही. यामुळे आपल्या शरीरात अन्नाद्वारे अतिरिक्त कॅलरीज जात नाही. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन वाढण्यावर नियंत्रण येते.