Join us  

Summer Special: उन्हाळा स्पेशल गारेगार रायत्याचे 4 प्रकार, जेवणाला चव-पोटाला थंडावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 7:29 PM

उन्हाळ्यात कूल इफेक्ट देणारे रायत्याचे वेगवेगळे चविष्ट प्रकार करता येतात. रायता झणकेदार हिरव्या मिरचीचा असू देत किंवा भाज्यांचा तो जेवणाला चव देतो आणि पोटाला थंडावा.

ठळक मुद्देपहाडी रायता करण्यासाठी मोहरी मिक्सरमधून बारीक करुन घ्यावी.कांदा पुदिन्याचा रायता फ्रिजमध्ये ठेवून गार करुन मग खावा.भाज्यांचा रायता करण्यासाठी आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घ्याव्यात. 

उन्हाळ्यात थंडगार वाटावं, पोटाला थंडावा मिळावा यासाठी दुपारच्या जेवणानंतर ताक प्यायलं जातं. पण जेवणातही रायत्याच्या स्वरुपात ही सोय करता येते. उन्हाळ्यात कूल इफेक्ट देणारे रायत्याचे वेगवेगळे चविष्ट प्रकार करता येतात. रायता झणकेदार हिरव्या मिरचीचा असू देत किंवा भाज्यांचा तो जेवणाला चव देतो आणि पोटाला थंडावा. 

Image: Google

1. हिरव्या मिरचीचा रायता

हिरव्या मिरचीचा रायता तयार करण्यासाठी 1 कप दही, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा साखर, तेल, जिरे पावडर, मीठ आणि  चिरलेली कोथिंबीर घ्यावी. सर्वात आधी एका भांड्यात दही घ्यावं. त्यात साखर घालून ते फेटावं. कढईत तेल गरम करावं. गरम तेलात हिरवी मिरची घालावी. ती तळल्या गेल्यावर फोडणी दह्यात घालावी. मीठ आणि जिरे पावडर घालून रायता चांगला हलवून घ्यावा. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

Image: Google

2. पहाडी रायता

पहाडी रायता करण्यासाठी दही, एक चमचा मोहरी, काकडी, चिमूटभर हळद, मीठ, लाल तिखट, हिरवी इरची आणि कोथिंबीर घ्यावी. पहाडी रायता करताना सर्वात आधी मोहरी मिक्सरमधून बारीक करावी. काकडी किसावी. काकडीतील अतिरिक्त पाणी काढून घ्यावं.  एका भांड्यात दही घ्यावं. त्यात वाटलेली मोहरी, हळद, मीठ, लाल तिखट घालावं. त्यातच बारीक कापलेली मिरची घालावी. रायता चांगला हलवून वरुन कोथिंबीर घालावी. 

Image: Google

3. कांदा पुदिन्याचा रायता

कांदा पुदिन्याचा रायता करण्यासाठी कांदा, पुदिना, मीठ, दही, भाजलेल्या जिऱ्यांची पावडर, चाट मसाल आणि लाल तिखट घ्यावं. सर्वात आधी कांदा बारीक चिरुन घ्यावा. पुदिन्याची पानं मिक्सरमधून बारीक वाटावीत. भांड्यात दही घेऊन ते फेटून घ्यावं. फेटलेल्या दह्यात चिरलेला कांदा, पुदिन्याची पेस्ट, मीठ, जिरे पावडर, चाट मसाला, लाल तिखट घालावं. हे रायतं खाण्यआधी फ्रिजमध्ये ठेवून थंडं करावं. 

Image: Google

4. भाज्यांचा रायता

भाज्यांचा रायता करण्यासाठी आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही भाज्या घेतल्या तरी चालतात. आवडीच्या भाज्या, दही, कांदा, टमाटा, गाजर, काकडी, हिरवी मिरची, मीठ, भाजलेल्य जिऱ्यांची पावडर, लाल तिखट आणि चाट मसाला घ्यावा. 

भाज्यांचा रायता करण्यासाठी कांदा आणि टमाटा सोडून बाकी सर्व भाज्या किसून घ्याव्यात. कांदा टमाटा बारीक चिरुन घ्यावा. एका भांड्यात दही घेऊन ते फेटावं. फेटलेल्या दह्यात सकिसलेल्या भाज्या, कांदा, टमाटा, मीठ, जिरे पावडर, लाल तिखट आणि चाट मसाला घालावा. रायता चांगला हलवून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती