Join us  

Summer Special : विकतचा पेप्सीकोला मुलांना द्यायची भीती वाटते? आता घरीच करा मस्त पेप्सीकोला, झटपट सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2022 10:56 AM

Summer Special : बाहेरचा पेप्सिकोला खाण्यापेक्षा तुम्ही मुलांना घरी तयार केलेला बाहेर सारखाच होणारा पेप्सिकोला देऊन खूश करु शकता. पाहूया घरच्या घरी पेप्सिकोला कसा तयार करायचा.

ठळक मुद्देदुपारी भर उन्हात किंवा रात्री जेवण झाल्यावर गारेगार खायची इच्छा झाल्यावर हे पेप्सिकोला किंवा कँडी खाण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या फ्लेवरपासून हे पेप्सिकोला किंवा कँडी तयार होऊ शकतात.

पेप्सिकोला असं नुसतं म्हटलं तरी आपल्यापैकी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. लहानपणी घरातील मोठ्यांची नजर चुकवून एकामागे एक खाल्लेले पेप्सिकोला नुसते आठवले तरी थंडगार वाटतं. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळणारे हे पेप्सिकोला खाणे म्हणजे भर उन्हाळ्यात पर्वणीच. लहान मुलांनासाठी परीक्षा संपून उन्हाळ्याची सुट्टी लागली की बर्फाचा गोळा, पेप्सिकोला, आइस्क्रीम म्हणजे मज्जाच (Summer Special) . असे असले तरी जास्त प्रमाणात पेप्सिकोला खाल्ला की घसा बसणे, सर्दी होणे किंवा पोट खराब होणे अशा समस्या उद्भवताना दिसतात. 

(Image : Google)

याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे यामध्ये वापरण्यात येणारे पाणी कसे आहे, कुठले आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. इतकेच नाही तर पेप्सिकोला बनवण्यासाठी वापरण्यात आलेले फ्लेवर नेमके चांगले आहेत की नाही हेही आपण सांगू शकत नाही. अशावेळी घरच्या घरीच पेप्सिकोला तयार केला तर? पाणी, साखर आणि एखादा फ्लेवर यांपासून अगदी सहज झटपट आपल्याला पेप्सिकोला किंवा कँडी घरच्या घरी तयार करता येते. त्यामुळे बाहेरचा पेप्सिकोला खाण्यापेक्षा तुम्ही मुलांना घरी तयार केलेला बाहेर सारखाच होणारा पेप्सिकोला देऊन खूश करु शकता. पाहूया घरच्या घरी पेप्सिकोला कसा तयार करायचा.

साहित्य -

१. पाणी - २ ग्लास २. साखर - ६ चमचे ३. फ्लेवर - ८ ते १० चमचे   (रोज सिरप, रसना सिरप, कच्चा आम सिरप, मँगो सिरप, खट्टा, मिठा सिरप, कोकम सिरप)

(Image : Google)

कृती -

१. दोन ग्लास पाणी घेऊन ते गॅसवर उकळायला ठेवा.२. या पाण्यात ६ चमचे साखर घालून ते हलवत राहा. ३. पाण्याला चांगली उकळी आपल्यानंतर त्यामध्ये तुमच्या आवडीचे सिरप किंवा फ्लेवर घालून हलवा. ४. हे मिश्रण थंड झाल्यानंतर कुल्फीच्या मोल्डमध्ये, लहान काचेच्या ग्लासमध्ये ओता. ५. त्याला वरुन आइस्क्रीमच्या काड्या लावून ५ ते ६ तासांसाठी ते फ्रिजरमध्ये ठेवा. ६. बाहेर काढल्यानंतर या मोल्डमधून ही कँडी बाहेर काढा.७. शक्य असेल तर तुम्ही विकतसारखे लहान आकाराच्या पिशव्यांमध्येही हे मिश्रण भरुन फ्रिजरमध्ये गार करायला ठेऊ शकता. ८. दुपारी भर उन्हात किंवा रात्री जेवण झाल्यावर गारेगार खायची इच्छा झाल्यावर हे पेप्सिकोला किंवा कँडी खाण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. 

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल