Join us  

सुटीत आजी करायची तसा गरमागरम नाश्ता, लहानपणीच्या चवीची आठवण करणारे ३ ‘ताकातले’ पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 4:18 PM

Summer Special Authentic Breakfast Recipes : आठवून पाहा, लहानपणी सुटीत आजीच्या घरी आपण काय खायचो नाश्त्याला, ऊन बाधण्याचा तर प्रश्नच नव्हता

लहानपणी आजीकडे गेलो की आजी सकाळी उठल्यावर सगळ्या मुलांना आंघोळी झाल्या की एका लाईनमध्ये बसवायची. डीशमध्ये छान गरमागरम नाश्ता समोर यायचा. यात सँडविच, मॅगी, सिरीयल असे काही नसायचे तर नाचणीचे, ज्वारीचे किंवा तांदळाच्या पिठाचे गरमागरम आंबिल असायचे. आता आपल्याला रोज सकाळी नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न पडतो. रात्रीच विचार करुन ठेवलेला असेल तर ठिक नाहीतर सकाळी उठून बराच वेळ काय करायचं हे ठरवण्यातच जातो. उन्हाळ्याच्या दिवसांत उकाड्याने लाहीलाही झालेली असताना शरीराला पोषण देणारा आणि शांत ठेवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा (Summer Special Authentic Breakfast Recipes).

(Image : Google)

अशावेळी नाचणी, ज्वारी, दही आणि ताक या गोष्टी शरीरातील थंडावा टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. ज्वारीचे आणि तांदळाचे पीठ आपल्याकडे घरात असतेच, नाचणीचेही चांगले पीठ आजकाल बाजारात सहज मिळते. या तिन्हीपासून आंबिल किंवा उकड कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. आंबट-गोड ताक असलेली ही उकड चवीला अतिशय छान लागते. अगदी झटपट होणाऱ्या या रेसिपी खायला तर चविष्ट लागतातच पण पौष्टीकही असतात. पूर्वीच्या काळी घरात आजी आवर्जून करायची अशा या रेसिपी कशा करायच्या पाहूयात. 

साहित्य -

१. नाचणी पीठ/ ज्वारी पीठ किंवा तांदूळ पीठ - १ वाटी

२. ताक - २ वाट्या 

३. साखर - १ चमचा 

४. मीठ - चवीनुसार 

५. लाल किवा हिरव्या मिरच्या - २ ते ३

६. तेल - १ डाव

७. मोहरी-जीरं - अर्धा चमचा 

८. हिंग - पाव चमचा 

९. कडीपत्ता - ८ ते १० पाने 

१०. कोथिंबीर - अर्धी वाटी 

११. लसूण - ५ ते ७ पाकळ्या

कृती -

१. एका पातेल्यात आपल्याला आवडेल ते पीठ आणि ताक एकत्र करुन घ्यायचे. यामध्ये वरुन २ ते ३ वाट्या आणखी पाणी बसते.

(Image : Google)

२. यात साखर आणि मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यायचे. 

३. कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी-जीरं आणि हिंग घालायचं.

४. फोडणी चांगली तडतडली की त्यात कडीपत्ता, मिरचीचे तुकडे आणि ठेचलेला लसूण घालायचा. 

५. फोडणी चांगली झाली की त्यामध्ये खाली एकत्र केलेले पीठाचे मिश्रण घालायचे. 

६. गॅस बारीक करुन गुठळ्या होऊ न देता सगळे चांगले हलवत राहायचे. 

७. मिश्रण जास्त घट्टसर होत असल्यास त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचे. 

८. चांगले शिजल्यावर झाकण ठेवायचे आणि थोडी वाफ काढायची. 

९. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम उकड खायला घ्यायची. 

१०. ताटलीत घेतल्यावर आवडत असल्यास यामध्ये तूप घ्यायचे.   

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती