उन्हाळा म्हटला की अंगाची लाहीलाही आणि त्यामुळे सतत लागणारी तहान. अनेकदा कितीही पाणी प्यायले तरी ही तहान भागतच नाही. मग आपल्याला सतत गार काहीतरी प्यायची इच्छा होते. एरवी आपण कोणाला भेटलो किंवा कामातून ब्रेक हवा असेल की अगदी सहज चही किंवा कॉफी घेतो. पण उन्हाळ्याच्या दिवसांत अशी चहा-कॉफी नको वाटते. अशावेळी सरबत, ज्यूस, कोल्ड्रींक किंवा गारेगार काहीतरी घ्यावेसे वाटते. कोल्ड कॉफी किंवा कोल्ड चॉकलेट हा गेल्या काही वर्षात प्रसिद्ध झालेला प्रकार. तरुणांमध्ये तर या कॉफीची खूप जास्त प्रमाणात क्रेझ आहे. कॅफेमध्ये किंवा हॉटेलमध्ये मिळणारी ही कॉफी छान फेसाळ असते आणि तितकीच मन तृप्त करणारीही असते. त्यामुळे आपणही अनेकदा उन्हाळ्यात ही कॉफी घेणे पसंत करतो. पण घरच्या घरी ही कॉफी करता आली तर? मधल्या वेळेला किंवा रात्रीचे जेवण झाल्यावर खूपच गरम होत असेल तर आपण ही कॉफी नक्की घेऊ शकतो (Summer Special Cold Coffee Recipe).
साहित्य -
१. कॉफी पावडर - २ चमचे
२. साखर - ४ चमचे
३. मिल्क पावडर - अर्धी वाटी
४. बर्फ - ५ ते ६ क्यूब
५. दूध- अर्धा लिटर
६. चॉकलेट सॉस - अर्धी वाटी
७. कोको पावडर - २ चमचे
कृती -
१. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात तुमच्याकडे उपलब्ध असणारी कोणतीही कॉफी पावडर घाला. ही फिल्टर कॉफीची किंवा इन्स्टंट कॉफी पावडर असू शकते. त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर आणि बर्फाचे तुकडे घाला. हे सगळे एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.
२. त्यानंतर याच भांड्यात थोडे दूध घालून पुन्हा हे मिश्रण फिरवून घ्या.
३. हे सगळे चांगले एकजीव झाले की त्यामध्ये चॉकलेट सॉस, मिल्क पावडर आणि उरलेले दूध घाला आणि पुन्हा सगळे चांगले मिक्सर करुन घ्या.
४. दूधाची कोल्ड कॉफी करत असलो तरी मिल्क पावडरमुळे या कोल्ड कॉफीला थोडा घट्टपणा येतो. तसेच चॉकलेट सॉसमुळे कॉफीच्या चवीत फरक पडतो.
५. एका ग्लासला कडेने चॉकलेट सॉस आणि कोको पावडर लावून घ्या. त्यानंतर त्यामध्ये मिक्सरमधली कॉफी ओता.
६. यामध्ये तुमच्या आवडीनुसार चोको चिप्स, कोको पावडर किंवा कॉफी पावडर वरुन घालू शकता. त्यामुळे ती दिसायला तर कॅफेमधल्यासारखी दिसतेच पण चवीलाही छान लागते. यामध्ये गार होण्यासाठी दोन क्यूब बर्फ घाला.
७. तीन वेळा वेगवेगळे पदार्थ घालून मिक्सर केल्याने या कॉफीला ग्लासमध्ये ओतल्यावर फेसही चांगला येतो. दूध घेताना ते न तापवता कच्चे घेतले तर त्यातील स्निग्धतेमुळे कॉफीचा घट्टपणा आणखी चांगला होतो.
८. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये व्हॅनिला किंवा चॉकलेट आइस्क्रीमचा गोळाही घालू शकता.