Join us  

उन्हाळ्यात नाश्त्याला करा गारेगार दही पोहे, शरीरासोबतच मनालाही गारवा देणारा पारंपरिक पौष्टिक पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2024 2:28 PM

Summer Special Dahi Pohe Recipe : झटपट होत असल्याने भूक लागली की ऐनवेळीही हे दही पोहे अगदी सहज करता येतात.

पोहे हा महाराष्ट्रात नाश्त्यासाठी किंवा पाहुणे आल्यावर केला जाणारा एकदम कॉमन पदार्थ. झटपट होणारे, पोटभरीचे असे गरमागरम कांदेपोहे, बटाटा पोहे अतिशय चविष्ट लागतात. त्यामुळे लहान मुलंही हे पोहे आवडीने खातात. काहीवेळा आपण पोह्यांचे थोडे वेगळे प्रकारही ट्राय करतो. यामध्ये दडपे पोहे, सांबार पोहे, इंदौरी पोहे असे काही ना काही ट्राय करतो. पण तरीही आपल्याला सतत पोहे खाऊन कंटाळा येण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर सतत पाणी पाणी होते आणि थंडगार काहीतरी खावेसे वाटते. अशावेळी पोह्यांचेच दही पोहे केले तर? हे दही पोहे करायला अतिशय सोपे, चविष्ट असल्याने सगळ्यांनाच ते खूप आवडतात. झटपट होत असल्याने भूक लागली की ऐनवेळीही हे दही पोहे अगदी सहज करता येतात. तसेच त्याची आंबट-गोड चव, खाराच्या मिरचीचा तडका आणि दाणे यांमुळे त्याची रंगत आणखी वाढते. पाहूयात हे पोहे कसे करायचे (Summer Special Dahi Pohe Recipe)...

साहित्य - 

१. जाड पोहे - २ वाट्या 

२. दही - १ ते १.५ वाटी 

३. तेल - २ चमचे

(Image : Google)

४. मीठ - चवीनुसार

५. साखर - चवीनुसार 

६. दाणे - एक मूठ

७. खाराची मिरची किंवा लाल मिरची - ३ 

८. हिंग - पाव चमचा

९. जीरे - पाव चमचा

१०. कडिपत्ता - ७ ते ८ पाने

११. कोथिंबीर - अर्धी वाटी बारीक चिरलेली 

कृती- 

१. आपण पोहे करण्यासाठी ज्याप्रमाणे पोहे भिजवतो तसेच भिजवायचे

२. दह्याचे घट्टसर ताक करुन घ्यायचे.

३. हे ताक, साखर आणि मीठ पोह्यात घालायचे.

४. कढईत तेल घालून त्यामध्ये जीरे, हिंग, कडिपत्ता, दाणे आणि खाराची मिरची घालायची.

५. ही फोडणी पोह्यांवर घालून सगळे नीट एकत्र करायचे. 

६. वरुन बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची.

७. थोडे गार हवे असतील तर हे पोहे १० मिनीटे फ्रिजमध्ये ठेवायचे. ५ मिनीटांत होणारे गारेगार दहीपोहे उन्हाळ्याच्या दिवसांत मस्त लागतात.

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.