उन्हाळ्यात सकाळ- दुपार- संध्याकाळ अगदी केव्हाही थंड काही तरी प्यायला दिलं तर बरंच वाटतं... अशावेळी तर घरात लहान मुलं आणि वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांनाही या काळात जेवण कमीच जातं आणि थंडगार काहीतरी पिण्याची इच्छा होते. तसंही उन्हाळ्यात डिहायड्रेशन रोखण्यासाठी लिक्विड पदार्थ अधिक प्रमाणात घेणं गरजेचं असतंच..
शिवाय उन्हाळ्यात घरी आलेल्या पाहुण्यांनाही गरम चहा पिणं नको वाटतं.. त्यामुळे त्यांना देण्यासाठीही घरात एखादं सरबत असलेलं कधीही उत्तम.. म्हणूनच तर पाहुण्यांसाठी, घरातल्या लहान- मोठ्या व्यक्तींसाठी आणि स्वत:साठीही करा घरच्याघरी रूह अफजा... शेफ कुणाल कपूर यांनी इन्स्टाग्रामला शेअर केलेली ही रेसिपी खरोखरंच अगदी खास आहे.. चव तर अशी लाजवाब आहे, की हा रूह अफजा तुम्ही घरी केला आहे, हे सांगूनही कुणाला खरं वाटणार नाही. झटपट होणाऱ्या या चवदार सरबताची ही घ्या अगदी सोपी रेसिपी...
रूह अफजा करण्यासाठी लागणारं साहित्य२- ३ टेबलस्पून रोझ सिरप, अर्ध्या लिंबाचा रस, चिमुटभर काळे मीठ आणि साधे मीठ, चिमुटभर मीरे पावडर, ४- ५ पुदिन्याची पाने, बर्फ, १ टेबलस्पून भिजवलेला सब्जा आणि थोडंसं सोडा वॉटररूह अफजा रेसिपी (Roohafza Recipe)- सगळ्यात आधी एका ग्लासमध्ये लिंबू पिळून घ्या.- त्यामध्ये मीठ, काळेमीठ, मीरेपूड, पुदिन्याची थोडीशी ठेचलेली पाने, रोझ सिरप टाका. हे सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.- त्यानंतर त्यात बर्फाचे तुकडे आणि भिजवलेला सब्जा टाका. - वरून साधे पाणी आणि थोडे सोडा वॉटर टाकले की झाला थंडगार होम मेड रूह अफजा तयार..
उन्हाळ्यात का प्यावा रूह अफजा (Benefits of Roohafza)- लिंबामुळे व्हिटॅमिन सी मिळतं, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.- रोझ सिरपमध्ये असणारा गुलाब पाकळ्यांचा अंश उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो.- पुदिन्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असल्याने एनर्जी मिळून फ्रेश राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो.- उन्हाळ्यात साधं पाणी खूप प्यावं वाटत नाही. त्यामुळे पाण्याऐवजी असं काहीतरी होम मेड थंडगार प्या आणि शरीराचं डिहायड्रेशन रोखा.- उन्हाळ्यात सब्जा खाणं देखील अतिशय आरोग्यदायी मानलं जातं. एरवी आपण आवर्जून सब्जा खात नाही. या माध्यमातून तो पाेटात जाणं कधीही चांगलंच.