उन्हाळ्यात मुलांना काहीतरी गार प्यायचं असतं. सतत फ्रीज उघडतात. गार पाणी पितात. बर्फ खातात. नाहीतर विकतचे कोल्ड्रिंक आइस्क्रिम मागतात. थंडगार ताक तर अनेकांना नको असतं. लिंबू सरबत, कोकम सरबत जुनाट वाटतं. पण कोल्ड्रिंक प्यायचं तर त्यात साखर फार, त्यानं वजन वाढतं. सोड्यानं घसा खराब होतो. पण मुलांना समजावता येत नाही. सुटीत त्यांनाही काहीतरी गारेगार वेगळं हवं असतं. त्यासाठीच करुन पाहा ही खास वेगळी सरबतं. ही सरबतं करताना मुलांनाही मदतीला घ्यायचं. ते हौशीने करतात. त्यांनाही करण्याचा आणि वेगळ्या चवीचा आनंददायी अनुभव मिळतो.
(Image :google)
पुदीना लिंबू सरबत
साहित्य:- एक वाटी पुदीन्याची पानं, थोडं आलं, एका लिंबाचा रस, सब्जा , साखर/गूळ
कृती:- आलं लिंबू रस, साखर आणि पुदीना हे सर्व मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यावं. पाणी घालून मिश्रण सरसरीत करावं. बारीक करावे म्हणजे गाळायला नको. सुंदर चवीचं, हिरवंगार सरबत प्यायला घेताना देताना यात सब्जा बी घालावं. हवं तर बर्फाचा चुरा घालावा.
(Image :google)
कलिंगड सरबत
कलिंगडाचे तुकडे ब्लेण्डरमधून फिरवून घ्यावेत. त्यात थोडे आलं आणि लिंबू रस घालावा. आवडत असल्यास काळी मिरपूड टाकू शकता.
यामध्ये सब्जा घातला तर फार छान. पुदीना पानंही चालतात. थंड दुधात हे सरबत घालून देता येतं. किंवा व्हॉनीला आइस्क्रिम पण छान लागतं.
(Image :google)
पान सरबत
साहित्य:- खायची पानं, बडीशेप,वेलची, गुलकंद हे सर्व मिक्सरमध्ये गुळगुळीत करून घ्यावं. व्हॅनिला आइस्क्रिम घालून प्यावं. हवं तर त्यात सब्जा बी घालावं. या सरबताला सुरेख हिरवा रंग येतो.