थंडीच्या दिवसांत आपण ज्याप्रमाणे उष्ण पदार्थ खाऊन शरीराचे तापमान बाहेरील हवामानाला मिळतेजुळते व्हावे यासाठी प्रयत्न करतो. तसंच उन्हाळ्याच्या काळात शरीर थंड राहावे आणि आरोग्याच्या तक्रारी उद्भवू नयेत म्हणून शरीराला थंडावा देणारे पदार्थ आवर्जून खायला हवेत. उन्हाळा म्हटलं की अंगाची लाहीलाही आणि नुसतं पाणीपाणी. उन्हामुळे आपल्याला अन्न तर जात नाहीच पण सतत काहीतरी गार प्यावसं वाटतं किंवा गोड खावसं वाटलं. म्हणूनच उन्हाळ्यात आरोग्यासाठी उपयुक्त असणारे कोकम सरबत, कैरीचे पन्हे, ताक, उसाचा रस आवर्जून प्यायले जाते (Summer Special). इतकेच नाही तर या काळात बाजारात आंबे, कलिंगड, खरबूज हा या ऋतूला साजेशी असणारी फळेही येतात. या काळात आणखी एक गोष्ट आपण सगळ्यांनी नक्की खायला हवी, ती म्हणजे गुलकंद (Gulkand). भारतातील पारंपरिक पदार्थांपैकी एक असणारा गुलकंद हा उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर अतिशय गुणकारी असतो. उन्हाळ्यात तापणारे शरीर थंड ठेवण्यासाठी गुलकंदाचा अतिशय चांगला उपयोग होतो. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या गुलकंदाचे आयुर्वेदात बरेच महत्त्व सांगितले असून गुलकंदाला या काळात मोठ्या प्रमाणात मागणी असते. नुसता गुलकंद खाण्याबरोबरच आपण त्याचा शिरा, लाडू, केक, मिल्क शेक असे बरेच पदार्थ करु शकतो.
गुलकंद खाण्याचे फायदे
१. उष्णता कमी करण्यास फायदेशीर
अनेकदा उन्हाळ्यात लघवीला जळजळ होणे,अॅसिडीटी, डोकेदुखी, मळमळ अशा समस्या उद्भवतात.तोंड आलं असल्यास, तोंडात चट्टे, फोडं आली असल्यास गुलकंद खाणं उपयुक्त ठरतं. तसेच गुलकंदामध्ये व्हिटॅमिन बीचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे व्हिटॅमिन बी ची कमतरता असणाऱ्यांनी गुलकंद नियमित खावा.
२. बद्धकोष्ठता
ज्यांना नेहमी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी आवर्जून गुलकंद खायला हवा. जेवल्यानंतर एक ते दोन चमचे गुलकंदाचं सेवन करावं, यामुळे पचन चांगल होतं आणि बद्धकोष्ठाची समस्याही दूर होते. गुलकंद आपल्या आतड्यांतील उपयुक्त ठरणारा गट बॅक्टेरिया वाढवण्यात मदत करते. ज्यामुळे आपल्याला जेवण पचवणं सोपं होतं. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या गुलकंदामधील मॅग्नेशियम बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देण्यास मदत करते.
३. स्मरणशक्तीसाठी फायदेशीर
आपल्या मुलांची स्मरणशक्ती चांगली राहावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोगही करत असतो. मुलांना नियमित गुलकंद दिल्यास, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी फायदा होतो. वास्तविक गुलकंदामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुण हे स्मरणशक्तीची क्षमता वाढविण्यास उपयुक्त असतात.
४. त्वचा सतेज राहण्यास मदत
गुलकंदामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस त्वचा एक्सफॉलिएट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. दररोज गुलकंद खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि त्वचा उजळते. तसेच गुलकंद खाल्ल्याने ब्लॅकहेड्स, पिंपल्स यांसारख्या त्वचेच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.
५. हृदयासाठी फायदेशीर
उत्तम आरोग्यासाठी हृदय निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या गुलकंदामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. मॅग्नेशियम रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत ठेण्यासाठी नियमित गुलकंद खाण्याचा उपयोग होतो.
घरच्या घरी गुलकंद कसा करायचा?
१. गुलाबाच्या काही पाकळ्या घ्या आणि त्या स्वच्छ काचेच्या बरणीत टाका.
२. एक वाटी गुलाबाच्या पाकळ्या असतील, तर तेवढीच साखर घ्यावी आणि त्यावर टाकावी.
३. तुम्हाला पाहिजे असल्यास पाकळ्यांचा आणि साखरेचा अजून एक थर द्यावा.
४. बाटलीचे झाकण घट्ट लावून ती सुर्यप्रकाशात ठेवावी.
५. यानंतर साखरेला पाणी सुटून साधारण १० दिवसांत गुलकंद तयार होतो.