शुभा प्रभू साटम
सूटी सुरु झाली की घरोघर एकच गलका सुरु होतो, काहीतरी वेगळं कर! आता तर बाहेरुन मागव किंवा हॉटेलात जाऊ असेही हट्ट सुरुच असतात. पण सतत बाहेरचं चटकमटक पोटाला आणि खिशालाही झेपायला हवं. त्याहून उत्तम म्हणजे मुलांनी आईवडिलांसोबत काही पदार्थ करायला शिकायला हवेत. सगळे मिळून करणं, त्या पदार्थांचे रंग गंध समजणं चव कळणं हे सारं शिकणंच आहे. आणि हे शिकणं घरीच व्हायचं असेल तर मग स्वयंपाकघराची प्रयोगशाळा आहेच. म्हणूनच सुटीसाठी हा खास अस्सल देशी शाकाहारी बर्गर. (veg burger) एकदम झकास आणि सुटसुटीत. मुलांच्या आवडीचा बर्गर, करायला सोपा. चवीला उत्तम. मुलांना सोबत घेऊन करा.. चव जास्त छान. (veg burger)
(Image : Google)
शाकाहारी बर्गर कसा करायचा?
साहित्य
चणे/राजमा : ६ तास भिजवून ,मऊ उकडून आणि कुस्करून, साधारण 2 वाट्या. आता यात तुम्हाला हवं तर उकडून किसलेले बिट/रताळे/फ्लॉवर घालू शकता.
बटाटा :उकडून,सोलून किसून १ वाटी
मेयोनीज. ते नसेल तर चक्क आपला चक्का घ्यावा. मस्त लागतो. १ वाटी,नीट फेटून.
मोहरी आणि मिरी एकेक चमचा जाडसर कुटून.
कांदा गोल कापून.
टोमॅटो गोल कापून.
चीझ स्लाईस माणशी १
सॅलड/लेट्यूस/कोबी यांची पाने.
बर्गर बन मधून कापून..
ऐच्छिक : पुदिन्याची हिरवी चटणी,मिरचीचे लोणचे
(Image : Google)
कृती
उकडलेले चणे/राजमा आणि बटाटे एकत्र व्यवस्थित कुस्करून घ्यावेत. गोळे बांधता आले पाहिजेत.
त्यात मीठ,चाट मसाला,लाल तिखट,साखर,लिंबू रस,गरम मसाला घालून एकत्र करून चपटे गोळे करून, ते रव्यात/ब्रेड क्रंबसमध्ये घोळवून शॅलो फ्राय करावेत.लालसर कुरकुरीत हवेत.
मेयोनीज अथवा चक्का घेऊन त्यात कुटलेली मोहरी मिरी घालवावी. हवं तर मिरचीचे लोणचे घालावे,अथवा हिरवी चटणी.
बर्गर बन तव्यावर किंचित शेकवून घ्यावेत
आता प्रथम बर्गर च्या दोन्ही तुकड्यांना मेयोनीज लावून घ्यावे,
बर्गरच्या खालील तुकड्यावर प्रथम लेटयूस/कोबी पान ठेवावे.
नंतर टोमॅटो,नंतर चणा पॅटीस/पॅटी,त्यावर चीझ स्लाईस ,त्यावर कांदा ठेवून बर्गर बंद करावा.
हवं तर मधून टूथ पीक टोचावी.
अस्सल देशी बर्गर तयार आहे. खा, मस्त चमचमीत शाकाहारी बर्गर.
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)