उन्हाळा म्हटलं की आपल्याला जसं थकून गेल्यासारखे, गळाल्यासारखे होते. तसेच सगळ्याच सजीवांचे होते. आपल्याप्रमाणे प्राणी, पक्षी आणि झाडेही पार सुकून गेल्यासारखी होतात. उन्हाचा तडाखा वाढला की हवेत एकप्रकारचा शुष्कपणा येतो आणि सगळे कोरडे व्हायला लागते. (Summer Special) थंडीच्या दिवसांत स्वस्त होणाऱ्या भाज्यांचे दर उन्हाळ्याच्या दिवसांत गगनाला भिडतात. त्यामुळे भाज्या जपून आणि अतिशय काळजीपूर्वक वापराव्या लागतात. भरमसाठी पैसे देऊन घेतलेल्या भाज्या वाळून गेल्या तर त्या वापरता येत नाहीतच. पण त्याची चवही जाते. आता अशाप्रकारे उन्हाळ्यात भाज्या सुकून जाऊ नयेत म्हणून काय करावे याविषयी....
१. उन्हाळ्याच्या दिवसांत लागतील तितक्याच भाज्या आणा. कारण या दिवसांत आज आणलेली भाजी उन्हामुळे उद्या शिळी झालेली असते. त्यामुळे नेहमीप्रमाणे खूप भाजी खरेदी न करता ४ दिवसांसाठी लागेल इतकीच भाजी खरेदी करा.
२. भाज्या बाजारातून आणल्यावर तुम्हाला लगेच आवरायला जमणार नसेल तर त्यावर हलक्या हाताने थोडे पाणी मारुन ठेवा. त्यामुळे त्यांचे कोमेजलेपण काहीप्रमाणात दूर होण्यास मदत होईल. मात्र पालेभाज्या लगेच निवडून पिशवीत किंवा डब्यात ठेवल्यास त्याचा ताजेपणा काही प्रमाणात टिकण्यास मदत होईल.
३. घरात भाज्या ठेवताना त्या सावलीत राहतील याची काळजी घ्या. उन्हामुळे भाज्या आहेत त्यापेक्षा जास्त कोमेजण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅलरी, खिडकी असे ज्याठिकाणहून ऊन येते त्याठिकाणी भाज्या ठेवणे टाळा.
४. पालेभाज्या किंवा ठराविक फळभाज्याही मऊ सुती ओल्या कापडात बांधून ठेवल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. ओल्या कापडात बांधल्याने त्यातील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. कापडस सुती असल्याने भाजी खूप ओलसरही राहत नाही. त्यामुळे ही पूर्वीपासून भाज्या साठवण्यासाठी वापण्यात येणारी पद्धत आहे. पालेभाज्या, कोथिंबीर अशा भाज्या ओल्या कापडात ठेवल्यास ताज्या राहण्यास मदत होते.
५. भाज्या फ्रिजमध्ये ठेवताना फ्रिजचे तापमान बाहेरच्या तापमानाशी मिळतेजुळते आहे की नाही याची तपासणी करा. आवश्यकतेमुसार फ्रिजचे तापमान कमीजास्त करा. फ्रिजमध्ये भाज्या वाळण्याची शक्यता नाही असे आपल्याला वाटत असले तरी फ्रिजमध्येही भाज्या वाळू शकतात. त्यामुळे त्या बंद डबा, पिशवी, फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी येणाऱ्या जाळीच्या पिशव्या अशा ठिकाणी ठेवा. म्हणजे त्या सुकून न जाता काही दिवस ताज्या राहण्यास मदत होईल.