कॉफी म्हणजे आपल्यापैकी अनेकांचा जीव की प्राण. चहानंतर भारतात प्रामुख्याने प्यायली जाणारी कॉफी आपल्या कामाचा शिणवटा घालवण्याचे एक उत्तम माध्यम आहे. सकाळी झोपेतून उठल्यावर तर कधी काम करताना थोडी तरतरी येण्यासाठी, इतकंच नाही तर आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटल्यावर प्यायली जाणारी कॉफी अनेकांसाठी खास असते. कॉफी म्हणजे गरमागरम वाफाळता कॉफीचा कप कप आपल्या डोळ्यासमोर येतो. पण त्याशिवायही या कॉफीचे असंख्य प्रकार आता मिळतात. फिल्टर कॉफी, इन्स्टंट कॉफी, ब्लॅक कॉफी.
याबरोबरच तरुणांमध्ये किंवा सर्वच वयोगटात आवडीने प्यायला जाणारा आणखी एक प्रकार म्हणजे कोल्ड कॉफी (Summer Special). उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला आवर्जून आठवणारा हा प्रकार बाहेर प्यायला गेलो तर ५० ते १०० रुपये जातातच. पण घरच्या घरी स्वच्छता राखत ही कोल्ड कॉफी आपण स्वत:च्या हाताने करुन प्यायलो तर? आपल्याला पाहिजे तेव्हा अगदी १० मिनीटांत आपण कॅफेसारखी कॉफी घरी करु शकतो. तिही अवघ्या १० मिनीटांत. त्यामुळे भर उन्हातून घरी आल्यावर तुम्हाला उन्हामुळे आलेला थकवा तर निघून जाईलच पण तुमचा मूडही फ्रेश होईल. पाहूया घरच्या घरी कोल्ड कॉफी (Recipe of Cold Coffee) कशी तयार करायची...
साहित्य -
१. कॉफी पावडर - २ चमचे२. साखर - ४ चमचे ३. मिल्क पावडर - अर्धी वाटी४. बर्फ - ५ ते ६ क्यूब५. दूध- अर्धा लिटर६. चॉकलेट सॉस - अर्धी वाटी७. कोको पावडर - २ चमचे
कृती -
१. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात तुमच्याकडे उपलब्ध असणारी कोणतीही कॉफी पावडर घाला. ही फिल्टर कॉफीची किंवा इन्स्टंट कॉफी पावडर असू शकते. त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर आणि बर्फाचे तुकडे घाला. हे सगळे एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.
२. त्यानंतर याच भांड्यात थोडे दूध घालून पुन्हा हे मिश्रण फिरवून घ्या.
३. हे सगळे चांगले एकजीव झाले की त्यामध्ये चॉकलेट सॉस, मिल्क पावडर आणि उरलेले दूध घाला आणि पुन्हा सगळे चांगले मिक्सर करुन घ्या.
४. दूधाची कोल्ड कॉफी करत असलो तरी मिल्क पावडरमुळे या कोल्ड कॉफीला थोडा घट्टपणा येतो. तसेच चॉकलेट सॉसमुळे कॉफीच्या चवीत फरक पडतो.
५. एका ग्लासला कडेने चॉकलेट सॉस आणि कोको पावडर लावून घ्या. त्यानंतर त्यामध्ये मिक्सरमधली कॉफी ओता.
६. यामध्ये तुमच्या आवडीनुसार चोको चिप्स, कोको पावडर किंवा कॉफी पावडर वरुन घालू शकता. त्यामुळे ती दिसायला तर कॅफेमधल्यासारखी दिसतेच पण चवीलाही छान लागते. यामध्ये गार होण्यासाठी दोन क्यूब बर्फ घाला.
७. तीन वेळा वेगवेगळे पदार्थ घालून मिक्सर केल्याने या कॉफीला ग्लासमध्ये ओतल्यावर फेसही चांगला येतो. दूध घेताना ते न तापवता कच्चे घेतले तर त्यातील स्निग्धतेमुळे कॉफीचा घट्टपणा आणखी चांगला होतो.
८. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये व्हॅनिला किंवा चॉकलेट आइस्क्रीमचा गोळाही घालू शकता.