उन्हाळा सुरू झाला की अंगाची लाहीलाही सुरू होते. नकळत पाणी, सरबत, ज्यूस पिण्याचे प्रमाण वाढते. तसेच या काळात बाजारात पाणीदार फळे आवर्जून मिळतात. कलिंगड आणि खरबूज ही त्यापैकी २ महत्त्वाची फळं असून शरीराला थंडावा आणि पाणी देणारी ही फळं आवडीने खाल्ली जातात.शरीराचे वाढलेले तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीराला पाण्याची जास्तीत जास्त आवश्यकता असते. भर उन्हात गारेगार खरबूज खाणे म्हणजे पर्वणीच (Summer Special Muskmelon Milkshake Kharbuj Sharbat Recipe).
खरबूज खाल्ल्याने केवळ गार वाटते असे नाही तर या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणात असतात. खरबूज खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांत उद्भवणारे डिहायड्रेशन, लघवीला त्रास होणे, बद्धकोष्ठता हे त्रास खरबूज खाल्ल्याने कमी होतात. हेच खरबूज नुसते चिरुन त्याच्या फोडी खाण्यापेक्षा त्याचा छान मिल्कशेक केला तर? अगदी झटपट होणारा आणि शरीराला थंडावा देणारा हा मिल्कशेक करायला सोपा असून तो नेमका कसा करायचा पाहूया...
१. खरबूज मधून अर्धा कापायचा आणि त्याच्या बिया काढून टाकायच्या
२. खरबूजाचा गर काढून तो मिक्सरमधून बारीक करुन घ्यायचा.
३. चमचाभर साबुदाणा पॅनमध्ये घालून त्यात पाणी घालायचे आणि साबुदाणा चांगला शिजवायचा
४. हे साबुदाणा शिजवलेले पाणी गाळून घ्यायचे आणि शिजलेला साबुदाणा वेगळा ठेवायचा.
५.एका बाऊलमध्ये ३ कप दूध घेऊन त्यात पाव कप कस्टर्ड पावडर घालून हे मिश्रण कढईमध्ये चांगले शिजवायच.
६. कस्टर्ड तयार होत असतानाच त्यामध्ये पाव कप साखर घालायची आणि एकजीव करायचे.
७. कस्टर्ड गार झाल्यावर यामध्ये खरबूजाचा गर घालून चिया सीडस आणि शिजवलेला साबुदाणा घालायचा.
८. आपल्या आवडीप्रमाणे काजू, बदाम, पिस्ते असे सुकामेव्याचे काप आणि खजूर घालून मिश्रण एकजीव करायचे.
९. उन्हाच्या वेळी हा गारेगार मिल्कशेक प्यायला घ्यायचा.