उन्हाळ्याचा दिवस मोठा असतो, त्यामुळे सारखं काही ना काही खायला लागतं. तसेच उन्हाने लाहीलाही झाल्याने सतत पाणी पाणी होतं. अशावेळी तोंडाला चव नसते, ही चव येण्यासाठी आणि पोटाला थंडावा मिळण्यासाठी नाचणी हा उत्तम घटक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत हवामानातील तापमान वाढलेले असल्याने शरीराला या तापमानाशी जुळवून घेताना थोड्या अडचणी येतात. अशावेळी ज्यांच्या शरीरात जास्त उष्णता असते त्यांना तर जास्त त्रास होण्याची शक्यता असते. यामध्ये गळू येणे, उष्णतेने डोळे येणे, मूत्रविकार, तोंड येणे अशा समस्या निर्माण होतात (Summer Special Nagli Recipes).
या समस्या त्रासदायक असल्याने आपल्याला रोजच्या गोष्टी करणे अवघड होते. अशावेळी नाचणी खाणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात आपण आहारात ताक, गुलकंद, सब्जा, दूध, दही हे पदार्थ आवर्जून घेतो. याबरोबरच नाचणीचा आहारात समावेश केल्यास ते फायदेशीर ठरते. नाचणीचे आंबील, लाडू, भाकरी असे काही ना काही पदार्थ आपल्याला माहित असतात. पण नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी वेगळं काही केलं तर नक्कीच ते आवडीने खाल्लेही जाते. पाहूयात नाचणीच्या पीठापासून झटपट करता येतील असे पदार्थ.
१. नाचणीचे डोसे
नाचणीच्या पीठात थोडा रवा आणि दही घालून पाणी घालून घट्टसर पीठ भिजवायचेय यामध्ये चवीनुसार मीठ, साखर घालायची. कोथिंबीर, लसूण असे चवीसाठी आवडीप्रमाणे घालून या पीठाचे एकसारखे डोसे घालायचे. हे गरमागरम डोसे चटणी किंवा लोणच्यासोबत अतिशय छान लागतात.
२. नाचणीचा हलवा
अर्धवट वाटलेली नाचणी तूपावर चांगली परतायची. त्यामध्ये गूळ किंवा साखर आणि दूध घालून ते छान शिजवायचे. यामध्ये सुकामेवा आणि वेलची पावडर घालून हलवा चांगला शिजवून घ्यायचा.
३. ढोकळा
नाचणीचे पीठ आणि ओटसचे पीठ यामध्ये दही घालून चांगले भिजवायचे. यात मीठ घालून आपण कुकरला ढोकळ्यासाठी ज्याप्रमाणे डब्यात ते पीठ लावतो त्याप्रमाणे ओतायचे. मग ढोकळ्यावर जीरं, मोहरी, मिरची, कडीपत्ता, हिंग यांची छान फोडणी द्यायची. वरुन हिरवीगार कोथिंबीर घालायची. हा गरम ढोकळा अतिशय छान लागतो.
४. नाचणीचा उपमा
नाचणीची भरड आणि रवा चांगला परतून घ्यायचा आणि आपण ज्याप्रमाणे दाणे, मटार, कांदा घालून उपमा करतो त्याचप्रमाणे उपमा करायचा. हा उपमा अतिशय चविष्ट लागतो आणि नाचणी असल्याने शरीराला पोषणही मिळण्यास मदत होते.