Join us  

Summer Special : परफेक्ट साउथ इंडियन दही भाताची पारंपरिक रेसिपी, उन्हाळ्यात दही भात सुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 12:42 PM

Summer Special : दह्यामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक घटक असल्याने दह्याचा आहारात आवर्जून वापर करावा असे आहारतज्ज्ञही कायम सांगतात. पाहूयात झटपट चविष्ट दहीभात कसा करायचा.

ठळक मुद्देदही आणि साखर यांमुळे या भाताला अतिशय छान आंबट गोड चव येते. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा भात आवडतो. दही भातामध्ये पटकन आळत असल्याने वाढताना हा भात कोरडा किंवा घट्ट झाला असे वाटल्यास तो ओलसर होण्यासाठी थोडे दूध घातले तरी चालते.

उन्हाळा आला की अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे सतत काहीतरी गारेगार प्यावसं किंवा खावसं वाटतं. या काळात पाणी, पाणीदार फळे जास्त प्रमाणात खायला हवीत असं आपण सतत वाचतो आणि ऐकतो. पण शरीराची एनर्जी टिकवून ठेवायची असेल तर आहारही चांगला हवा. भर उन्हात (Summer Special) दुपारी गार पोळी भाजी अजिबात नको होते. मग कधी ताज्या कैरीचं लोणचं, कधी काकडी तर कधी ताक सोबत घेऊन आपण कसंबसं जेवण करतो. पण अनेकदा उन्हामुळे भूक लागत नाही आणि खायची इच्छाही होत नाही. पण छान वेगळं, टेस्टी आणि तरीही आरोग्यासाठी अतिशय पोषक असे काही ताटात समोर आले तर? उन्हाळ्याच्या दिवसांत मनाला आणि शरीराला गारवा देणारे दही आपल्या सगळ्यांनाच आवडते. याच दह्याचा वापर करुन साऊश इंडियन स्टाइलचा दहीभात (Curd Rice) केला तर बाहेर कितीही ऊन असले तरी ते काही प्रमाणात सुसह्य होऊ शकते. तसेच दह्यामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक घटक असल्याने दह्याचा आहारात आवर्जून वापर करावा असे आहारतज्ज्ञही कायम सांगतात. पाहूयात झटपट चविष्ट दहीभात कसा करायचा.

(Image : Google)

साहित्य 

१. तांदूळ - २ वाट्या २. दही - ३ वाट्या३. कडीपत्ता - ८ ते १० पाने ४. दाणे - अर्धा वाटी५. उडिद डाळ - पाव वाटी ६. साखर - १ चमचा७. मीठ - १ चमचा८. लाल मिरच्या - ३ ते ४ ९. तेल - २ चमचे १०. जीरे - अर्धा चमचा११. हिंग - पाव चमचा १२. कोथिंबीर - अर्धा वाटी चिरलेली

(Image : Google)

कृती

१. कुकरमध्ये नेहमीप्रमाणे भात शिजवून घ्यायचा.२. भात शिजल्यानंतर तो थोड्या पसरट भांड्यात मोकळा करुन काढून ठेवायचा.३. दही थोडे फेटून त्यामध्ये साखर, मीठ घालायचे.४. तेल चांगले तापवून त्यामध्ये जीरे, हिंग घालायचे.५. फोडणी तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता, उडीद डाळ, दाणे आणि लाल मिरची घालून ते सगळे चांगले तळून घ्यायचे. ६. भातावर फोडणी घालून दही घालायचे आणि सगळे एकत्र हलवून एकजीव करायचे. ७. दही भातामध्ये पटकन आळत असल्याने वाढताना हा भात कोरडा किंवा घट्ट झाला असे वाटल्यास तो ओलसर होण्यासाठी थोडे दूध घातले तरी चालते.८. वरुन हिरवीगार कोथिंबीर घातलेला हा भात तब्येतीसाठी तर चांगला असतोच पण दही आणि साखर यांमुळे या भाताला अतिशय छान आंबट गोड चव येते. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा भात आवडतो.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स