उन्हाळ्याच्या दिवसांत हवेतील तापमान वाढल्याने आपल्याला सतत घाम येतो आणि उन्हामुळे थकल्यासारखे होते. तापमानामुळे घशाला कोरड पडल्याने सतत पाणी पाणी होते. म्हणूनच या काळात आहारात जास्तीत जास्त द्रव पदार्थांचा, शरीराला थंडावा देणाऱ्या आणि एनर्जी मिळेल अशा पदार्थांचा समावेश ठेवावा असे आवर्जून सांगितले जाते. म्हणूनच आपण सरबते, कलिंगड, द्राक्ष, खरबूज यांसारखी पाणीदार फळे, आंब्यासारखे एनर्जी देणारे फळ, दही-ताक यांचा समावेश करतो.
यासोबतच आहारात सातूच्या पीठाचाही अवश्य समावेश करायला हवा. शरीराला थंडावा मिळावा आणि एनर्जी टिकून राहावी यासाठी सातूचे पीठ अतिशय फायदेशीर असते. गहू, डाळं, सुंठ, जीरं आणि वेलची अशा पदार्थांपासून केली जाणारी ही पारंपरिक रेसिपी आपण घरीही तयार करु शकतो किंवा हल्ली बाजारातही सातूचे पीठ सहज उपलब्ध असते. सातूच्या पीठामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण भरपूर असते. थकवा दूर करण्यासाठी, रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी सातूचे पीठ खाणे फायदेशीर असते (Summer Special Sattu Recipe and Benefits).
सातूचे पीठ खाण्याची पद्धत
एका व्यक्तीसाठी साधारण तीन ते चार टेबल स्पून एवढे सातूचे पीठ घ्यावे. त्यामध्ये आवडीनुसार साखर घालावी आणि कोमट दूध किंवा पाणी घालून ते कालवावे. कालवताना पाणी आणि दूध एकदम न घालता हळूहळू घालावे आणि चमच्याने फिरवत राहावे म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत. साखरेऐवजी गुळ वापरणार असाल तर गुळाचे पाणी आधी करून घ्यावे आणि त्या पाण्यात सातूचे पीठ कालवावे. हे पीठ जास्त घट्ट आणि जास्त पातळ नको. चमच्याने खाता येईल असे सरसरीत पीठ कालविले जावे. सातूचे पीठ कालविण्यासाठी पाण्याऐवजी दुधाचा वापर केला तर त्यातील पौष्टिकता वाढण्यास मदत होते. गहू आणि डाळं भाजून त्याचे पीठ केलेले असल्याने हे पीठ पचायला हलके असते.
सातूचे फायदे
१. सातुच्या पिठामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे लहान मुलांना, गर्भवती स्त्रियांना आणि वयस्कर व्यक्तींना हे पीठ आवर्जून दिले जाते.
२. याशिवाय लायसिन हे अमिनो ॲसिड, फॉलिक ॲसिड यांसाठी सातुचे पीठ उत्तम स्त्रोत मानले जाते.
३. सातुच्या पीठातून प्रोटिन्स भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे ते थाेडंसं खाल्लं तरी त्यातून भरपूर उर्जा मिळते. प्रोटीन्स आरोग्यासाठी आवश्यक घटक असल्याने ते आवर्जून खायला हवं.
४. स्त्रियांच्या बाबतीत सातुचे पीठ नियमित खाल्ल्याने मासिक पाळीतल्या वेदना कमी होतात. स्नायू बळकट होण्यासाठीही सातुचे पीठ फायदेशीर ठरते.
५. सौंदर्याच्या दृष्टीनेही सातुचे पीठ खाणे महत्त्वाचे मानले जाते. कारण त्यामुळे डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी तसेच केस गळती थांबविण्यासाठी मदत होते.