उन्हाळा म्हटलं की अंगाची लाहालाही आणि त्यामुळे हैराण झालेले आपण. अशा वातावरणात सतत गारेगार काहीतरी खावसं वाटतं. सतत तीच ती पोळी भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो. मुलांना शाळेलाही सुट्ट्या लागलेल्या असतात. अशावेळी सतत वेगळं काय करायचे असा प्रश्न तमाम महिलावर्गापुढे असतो. अशाच महिलांसाठी आम्ही आज एक खास रेसिपी सांगणार आहोत. आपण नेहमी दहीवडे करतो. हे वडे उडीद डाळीचे असतात. पण यासाठी डाळ भिजवा, वाटून घ्या आणि मग तळा अशी सगळी प्रक्रिया करावी लागते. पण दही फुलकी करण्यासाठी इतकं काही करावं लागत नाही. तर अगदी झटपट होणारा आणि सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ कसा करायचा पाहूया...
साहित्य -
डाळीचे पीठ - १ वाटी
दही - २ वाट्या
तेल - १ वाटी
मीठ - चवीपुरते
चिंचेची चटणी - अर्धी वाटी
पुदीना चटणी - अर्धी वाटी
जीरे पावडर - अर्धा चमचा
तिखट - पाव चमचा
साखर - अर्धा चमचा
कोथिंबीर - अर्धी वाटी
कृती -
१. एका बाऊलमध्ये दह्यात थोडे पाणी घालून ते सारखे करुन घ्यायचे. त्यामध्ये मीठ थोडे तिखट आणि साखर घालून ते मुरायला ठेवायचे.
२. डाळीच्या पीठात मीठ आणि पाणी घालून याचे वड्याला करतो तसे पातळ पीठ करा.
३. १५ मिनीटांनी या पीठाचे लहान लहान भज्यासारखे तळून घ्या.
४. एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात ही भजी घाला. त्यात थोडे पाणी शोषले जाईल.
५. पाण्यातली भजी या दह्यात घाला. त्यावर जीरे पावडर, तिखट, मीठ, चिंचेची चटणी, पुदीना चटणी घाला.
६. यामध्ये आपण आवडीनुसार, शेव, फरसाण, डाळींबाचे दाणे, कांदा असे चाटमध्ये घालतो ते काहीही घालू शकतो.
७. हरभरा डाळ आणि दही दोन्हीमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण भरपूर असल्याने आरोग्यासाठीही हा पदार्थ चांगला असतो. तसेच दही गार असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत थंडावा तर मिळतोच. पण तोंडाची चव गेली असेल तर हा उत्तम पर्याय आहे.