Join us  

भाज्या महागल्या, उन्हाळ्यात चटकमटकही हवं? करुन पाहा पहाडी टोमॅटो चटणी, झटपट चमचमीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 12:59 PM

भाज्या महागतात, उन्हाळ्यात नेहमीच्या भाज्यांचाही कंटाळा येतो अशावेळी नक्की करता येईल कमी साहित्यात ही टोमॅटो चटणी.

ठळक मुद्देगरमागरम फुलके आणि चटणी असं मस्त जेवणही होऊ शकेल.

शुभा प्रभू साटम

उन्हाळ्यात भाज्या कमी असतात, असतात त्या महागही मिळतात. नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, काहीतरी चटपटीत हवं असतं. मुलं सतत वेगळं काहीतरी मस्त कर म्हणून लकडा लावतात. आणि ते वेगळं काही करायला ना नसते पण झटपट आणि करायला सोपे असेही जिन्नस हवेत असतात. त्यावेळी ही टोमॅटो चटणी मस्त उपयोगी येते. गंमत म्हणजे यामध्ये प्रत्यक्ष शिजवणे काहीही नाहीये. ही खरं तर नेपाळ मधील पारंपरिक चटणी आहे. दुर्गम भागात राहणारे आणि अनेकदा गरीब घरातील कुटुंबे हा पदार्थ करतात. अशीच चटणी लडाख मध्ये पण दिली जाते. मोमो सोबत जी चटणी असते ना ती खर तर हीच चटणी. पहाडी पाककृती सुटसुटीत असतात, फार खटाटोप न करता झटपट होणारे पदार्थ करण्याकडे कल असतो. तेल मसाले यांचा वापर पण माफक असतो. मोजके जिन्नस लागतात याला. पण आपण त्यात भर घालून चव आणखीन वाढवू शकतो.

(Image : Google)

तर कशी कराल ही टोमॅटो चटणी?

साहित्य :मोठे टोमॅटो 4 ते 5, लसूण थोडा जास्त, आवडीप्रमाणे हिरवी अथवा लाल मिरची,साखर, मीठ, लिंबू रस, आवडीप्रमाणे कोथिंबीरटोमॅटो -लसूण -मिरच्या चक्क वांग्याप्रमाणे खरपूस भाजून घ्या,जाळीवर भाजा अथवा तव्यावर,कसेहीतुम्हाला हवेतर वाटा अथवा आपण वांगे कसे कुस्करतो तसे कुस्करून घ्या,त्यात मीठ साखर लिंबू रस आणि कोथिंबीर.

(Image : Google)

आता यात व्हॅल्यू ऍडिशन काय कशी होईल?

1. भाजलेले टोमॅटो लसूण याना फोडणीवर परतुन2. वरून कढीलिंब राई यांची फोडणी देऊन3. फोडणीत कांदा परतून त्यात मग टोमॅटो घालून4. नुसती शिजवून त्यात व्हिनेगर घालून5. खजूर घालून.बेस तोच ठेवून असे काही डोक्यालिटी लावून करता येते,अत्यन्त चविष्ट अशी ही चटणी ब्रेड परोठे किंवा डाळ भात यासोबत जमून जाते. सॅण्डविच, मोमो, धिरडे, कटलेट किंवा गरमागरम फुलके आणि चटणी असं मस्त जेवणही होऊ शकेल.

(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :अन्नसमर स्पेशल