Join us  

Summer Special : कलिंगड खरेदी करताना ते आतून लालबुंद, गोड, रवाळ आहे हे कसं ओळखाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 6:11 PM

Summer Special :आपण इतके पैसे देऊन खरेदी करत असलेले कलिंगड चांगले आहे की नाही हे बाहेरुन कसे ओळखायचे ते पाहूया....

ठळक मुद्देचांगल्या कलिंगडाची पारख करताना ती अनेक प्रकारे करता येते. आतल्या रंगावरुनही तुम्ही कलिंगड चांगले आहे की नाही हे ओळखू शकता. 

उन्हाळा म्हटला की आपल्याला फळांचा राजा आंबा ज्याप्रमाणे आठवतो त्याचप्रमाणे या काळात येणारे आणखी एक रसदार आणि सगळ्यांना आवडणारे फळ म्हणजे कलिंगड. लालबुंद आणि रसाळ गोड असे कलिंगड भर उन्हातून आल्यावर आपल्याला दिलासा देते. डोक्यावरच्या तळपत्या उन्हात कलिंगडाचा गारवा आपल्याला काहीसा शांत आणि तृप्त करतो (Summer Special). बाहेर कडक ऊन असताना रवाळ आणि गोड कलिंगड खाल्ले की आपल्यालाही तृप्त झाल्यासारखे वाटते. मनाची आणि शरीराची तहान शमवणारे हे फळ आरोग्यासाठीही बरेच फायदेशीर असते. पण हल्ली बाजारात अनेकदा आपल्याला फळे-भाज्या खरेदी करताना फसवले जाऊ शकते. पैशासाठी वेगवेगळी रासायनिक उत्पादने वापरुन फळे पिकवतात. ही आपल्या आरोग्यासाठी तर घातक असतातच पण खाण्यासाठीही त्यांना विशेष चव नसते. आता कलिंगड खरेदी करताना ते आतून लाल, रसाळ, गोड असेल की नाही हे आपण सांगू शकत नाही (How to identify good quality watermelon). पण आपण इतके पैसे देऊन खरेदी करत असलेले कलिंगड चांगले आहे की नाही हे बाहेरुन कसे ओळखायचे ते पाहूया....

(Image : Google)

१. काळा डाग

कलिंगडावर काळा स्पॉट असेल किंवा एखादा डाग असेल तर ते कलिंगड आतून गोड असेल याची आपण खात्री देऊ शकत नाही. हा डाग काळा, पांढरा किंवा हिरवा असू शकतो. पण तो डाग थोडा ठिसूळ असेल तर कलिंगड खराब लागण्याची शक्यता असते. 

२. सालाचा रंग तपासा

कलिंगड हे पूर्ण हिरव्या रंगाचे असते किंवा हिरवे आणि पिवळे पट्टे अशा दोन रंगात असते. गडद हिरव्या रंगाचे साल असलेले कलिंगड गोड असण्याची शक्यता अधिक असते. तर एकसारखे पट्टे असणारे कलिंगडही गोड असू शकते. पण याच्यापेक्षा वेगळे किंवा फिकट असलेले कलिंगड म्हणावे तितके गोड, रसाळ नसते. त्यामुळे सालावरुन तुम्ही कलिंगडाची पारख करु शकता. 

३. आतला रंग बघा

काही वेळा आपण महागडी फळे घेत असू तर आपण ती विक्रेत्याला कापून दाखवायला सांगतो. त्याप्रमाणे कलिंगड तुम्ही कापून घेऊ शकता. एक लहानसा तुकडा कापून घेतला तर तुम्हाला संपूर्ण फळ कसे आहे याचा अंदाज येतो. आतल्या बाजुने कलिंगड लाल बुंद असेल तरच ते गोड असण्याची शक्यता असते. आतून कलिंगड गुलाबी, पांढरे किंवा काळे असेल तर ते गोड नसते. त्यामुळे आतल्या रंगावरुनही तुम्ही कलिंगड चांगले आहे की नाही हे ओळखू शकता. 

(Image : Google)

४. वासावरुन ओळखा

कलिंगड आतून गोड आणि रसाळ असेल तर त्याचा गोड वास येतो, तसेच ते ताजे असल्याचे समजते. पण कलिंगड खूप जुने असेल किंवा आतून खराब असेल तर त्याचा कडवट, आंबट वास येतो. अशावेळी ते कलिंगड चांगले नाही हे आपण ओळखायला हवे. असे कलिंगड कापले तरी ते आतून कच्चे किंवा खराब असू शकते. 

५. रवाळपणा

कलिंगड रवाळ असेल तर ते चवीला चांगले लागते. पण ते खूप स्मूद असेल तर किंवा फारच कापसासारखे लागत असेल तर ते चवीला चांगले लागत नाहीच. पण ते कलिंगड आरोग्यासाठीही फारसे चांगले नसते. चांगले कलिंगड हे बियांशी एकसंध असते तर खराब कलिंगडाच्या आतील भाग हा बियांपासून वेगळा होणारा असतो. त्यामुळे चांगल्या कलिंगडाची पारख करताना ती अनेक प्रकारे करता येते. 

टॅग्स :अन्नफळेकिचन टिप्ससमर स्पेशल