आहारात सर्वच गोष्टी चवीसाठी म्हणून खायच्या नसतात. तर पौष्टिकताही महत्त्वाची असते. पण असेही पदार्थ करता येतात जे पौष्टिकही आहेत आणि चविष्टही. सोयाबीन ग्रीन मसाला ही भाजी यातलीच एक. ग्रीन ग्रेव्ही, रेड ग्रेव्ही हे शब्द आपण हॉटेलमधे आर्डर देतांनाच वापरतो. पण घरीही अशा ग्रेव्ही करता येतात. मुळात सोयाबीन खाणं हे आरोग्यदायी आहे. सोयाबीन खाल्ल्यानं शरीरास प्रथिनं मिळतात. शिवाय स्नायुंची ताकद वाढवण्याचं, चयापचय क्रिया सुधारण्याचं, हाडं , केस आणि त्वचेचं आरोग्य सुधारण्याचं काम सोयाबीन करतं. सोयाबीनमुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं.
सोयाबीन आणि आरोग्य याबाबतचा अभ्यास सांगतो की सोयाबीन शरीरात चरबी जमा होवू देत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही सोयाबीनचा उपयोग होतो. सोयाबीनचे हे फायदे बघून सोयाबीन खावेसे वाटतीलही. पण रोज एकाच प्रकारची भाजी खाऊनही कंटाळा येऊ शकतो. सोयाबीनचे अनेक पदार्थ करता येतात .तसेच सोयाबीनची भाजीही विविध पध्दतीने करता येते. सोयाबीन ग्रीन ग्रेव्ही मसाला हा चविष्ट प्रकार एकदा करुन पहाच. मोठ्यांसोबत मुलांनाही नक्की आवडेल.
छायाचित्र:- गुगल
सोयाबीन ग्रीन ग्रेव्ही मसाला करण्यासाठी 150 ग्रॅम सोया वडी, 2 बटाटे, तेल/तूप, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, 1 कप उकडलेल्या कांद्याची पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, अर्धा कप टमाटा प्युरी, चवीनुसार मीठ, दिड कप पालक प्युरी, 1 छोटा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, पाव कप पाणी अर्धा चमचा गरम मसाला आणि लिंबाचा रस एवढी सामग्री घ्यावी.
छायाचित्र:- गुगल
सोयाबीन ग्रीन ग्रेव्ही मसाला कशी कराल?
ही भाजी तयार करताना आधी सोया वड्या 10-15 मिनिटं गरम पाण्यात भिजवाव्यात. बटाटे सोलून त्याचे मध्यम आकाराचे काप करावेत. एका कढईत तेल किंवा तूप गरम करावं. त्यात हिंग, जीरे, कांदे उकडून त्याची केलेली पेस्ट, आलं लसूण पेस्ट, कापलेली हिरवी मिरची घालून हा मसाला चांगला परतून घ्यावा. वाटल्यास थोडं पाणी घालावं. नंतर यात टमाटा प्युरी, मीठ, हिंग, हळद, लाल तिखट, धने पावडर घालावी. यानंतर मसाल्यात पाण्यात भिजवून पिळून घेतलेल्या सोया वडया आणि बटाट्याचे काप घालावेत. थोडं पाणी घालून 5-10 मिनिटं ते शिजू द्यावं. नंतर त्यात ब्लांच केलेल्या पालकाची प्युरी घालावी. पालक प्युरी घातल्यानंतर भाजी आणखी 10 मिनिटं शिजू द्यावी. सर्वात शेवटी गरम मसाला आणि लिंबाचा रस घालावा. ही भाजी पोळी किंवा पराठ्यांसोबत छान लागते.