औरंगाबाद या ऐतिहासिक शहरातील पर्यटनस्थळे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. अजिंठा आणि वेरूळ लेणी तसेच दौलताबाद किल्ला ही पर्यटनस्थळे पाहण्यासाठी तर दरवर्षी हजारो विदेशी पर्यटक औरंगाबादला भेट देत असतात. या देखण्या औरंगाबादमधील वेरूळ लेणी आणि दौलताबाद किल्ला पाहण्याचा मोह खासदार सुप्रिया सुळे यांनाही झाला. त्यामुळे त्या सहकुटूंब नुकत्याच औरंगाबाद दौऱ्यावर येऊन गेल्या आणि वेरूळ तसेच दौलताबाद किल्लाचे सौंदर्य अनुभवले. या दोन्ही ठिकाणी त्यांनी बराच वेळ दिला आणि या स्थळांचा इतिहास जाणून घेतला.
सुप्रिया सुळे यांच्या या दौऱ्यात सगळ्यात लक्षवेधी ठरलेली बाब म्हणजे त्यांनी औरंगाबादच्या ऐतिहासिक पदार्थाची घेतलेली दखल. 'खाजा' हा पदार्थ म्हणजे औरंगाबादची आणखी एक खासियत. वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला या परिसरातून फिरताना खा. सुप्रिया सुळे यांच्या नजरेस हा पदार्थ पडला आणि त्यांना याबाबत उत्सूकता वाटली. त्यांनी त्यांनी गाडी थांबवायला लावली आणि थेट जाऊन हा पदार्थ ज्या लहानश्या हॉटेलमध्ये तयार होत होता, तेथे जाऊन हा पदार्थ कशा पद्धतीने केला जातो हे त्यांनी बारकाईने पाहिले. एवढेच नव्हे तर हा पदार्थ चाखून पाहिला आणि त्याची रेसिपीदेखील जाणून घेतली.
खाजा हा असा एक पदार्थ आहे जो तुम्हाला औरंगाबादच्या कोणत्याही थ्री स्टार हॉटेलमध्ये मिळणार नाही. शहरात जे काही रेस्टॉरंट्स आहेत, त्यामध्ये देखील तुम्हाला खाजा मिळणार नाही. हा एक पारंपरिक पदार्थ असून तो केवळ ठराविक ठिकाणीच मिळतो. हा पदार्थ बनविणारे शेफ देखील औरंगाबाद शहरात मोजकेच आहेत आणि त्यांनी हा ऐतिहासिक पदार्थ खऱ्या अर्थाने जपला आहे. हा पदार्थ खायचा असेल तर तुम्हाला वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला, खुलताबाद या परिसराला भेट द्यावी लागेल. या ठिकाणी रस्त्यालगत असणाऱ्या लहान हॉटेलमध्ये हा पदार्थ बनविला जातो.
काय सांगतो या पदार्थाचा इतिहास?या पदार्थाचा इतिहास सांगताना औरंगाबाद येथील प्रसिद्ध इतिहास अभ्यासक रफत कुरेशी म्हणाले की हा पदार्थ पुर्वी अगदी खास प्रसंगी बनविला जायचा. खुलताबाद परिसरात जर जरी जर बक्ष यांचा वार्षिक उरूस असतो, या उरुसाचे औचित्य साधून खाजा बनविण्यात येतो. उरूसाच्या काळात या परिसरात ठिकठिकाणी खाजा बनविण्याची हॉटेल्स थाटली जातात. उरुस काळात परराज्यातून शहरात येणारे नागरिक हा पदार्थ आवर्जून त्यांच्या घरी घेऊन जातात. ४ ते ५ दिवस खाजा चांगला टिकतो.
कसा बनवायचा खाजा?खाजा बनविण्याची एक खास रेसिपी आहे. मैदा वापरून हा पदार्थ तयार केला जातो. यासाठी सगळ्यात आधी मैद्यामध्ये थोडे मीठ आणि खूप जास्त तूप टाकले जाते. पाणी टाकून पीठ चांगल्या पद्धतीने मळून घेतले जाते. पीठ जेवढे चांगले आणि जेवढे जास्त वेळ भिजवले आणि मळले जाते, तेवढा त्यापासून खाजा उत्तम तयार होतो. पीठ मळून काही काळ तसेच झाकून ठेवावे. यानंतर पोळी लाटण्यासाठी आपण कणकेचा जेवढा गोळा घेतो, तेवढा गोला घ्यावा आणि गोलाकार लाटावा. पुरीपेक्षा मोठा लाटून झाल्यानंतर एका कढईत थोडेसे तूप टाकावे आणि खाजा त्यामध्ये चांगल्या पद्धतीने भाजून घ्यावा. यानंतर एका कढईत साखरेचा पाक करून घ्यावा आणि तुपावर छान खरपूस भाजलेला खाजा साखरेच्या पाकात बुडवून पुन्हा लगेचच वर काढून घ्यावा. तूप आणि साखर यामुळे खाजाची चव अतिशय लाजवाब लागते. पाकात बुडवून लगेचच काढल्यामुळे तो जास्त गोडही नसतो, तरी देखील त्याचा गोडवा जिभेवर रेंगाळत राहतो, हेच तर खाजाचे वैशिष्ट्य आहे.