रात्रीच्या वेळी आपण जेवणात पोळी-भाजी असली तरी गरम वरण भात आवर्जून करतो. दुपारी बरेचदा ऑफीसच्या निमित्ताने डबा नेत असल्याने रात्री आपल्याला गरम आणि पोळी-भाजीपेक्षा वेगळं जेवण हवं असतं. अशावेळी आपण कोशिंबीर, पापड किंवा तोंडी लावण्याचे प्रकार आवर्जून करतो. नेहमीच कोशिंबीर किंवा चटणी आणि लोणचं खाण्यापेक्षा गरम वरण भातासोबत काप अतिशय छान लागतात. कोकणात आवर्जून सुरण, बटाटा, वांगी, केळी यांचे काप केले जातात. हे काप आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि जेवणाची रंगतही वाढवतात.
सुरणामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांचा साठा आढळतो. तसेच त्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी ६ सारखी जीवनसत्त्वे देखील असतात. व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि विविध आजारांपासून होण्यास मदत होते. गदी ५ मिनीटांत होणारे, चविष्ट लागणारे आणि भरपूर पोषण असलेले सुरणाचे काप केले तर हेच साधंसुधं जेवण आणखी मस्त होऊ शकतं.
सुरणाचे काप करण्याची रेसिपी
साहित्य -
१. सुरण - पाव किलो
२. बारीक रवा - अर्धी वाटी
३. तांदळाचे पीठ - पाव वाटी
४. तिखट - अर्धा चमचा
५. पिठीसाखर - अर्धा चमचा
६. मीठ - चवीनुसार
७. तेल - अर्धी वाटी
कृती -
१. सुरण असेल तर ते नीट साफ करुन त्याचे पातळ काप करुन कुकरमध्ये एक शिट्टी काढून घ्यायची.
२. एका डीशमध्ये रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करायचे.
३. यामध्ये मीठ, तिखट आणि पिठीसाखर घालून एकजीव करायचे.
४. सुरणाचे अर्धवट उकडलेले काप यामध्ये घोळवायचे.
५. पॅनमध्ये तेल घालून त्यावर हे काप दोन्ही बाजूने खरपूस शॅलो फ्राय करायचे.
६. गरमागरम हे कुरकुरीत काप जेवणाची रंगत वाढवतात आणि शरीराचेही पोषण करणारे ठरतात.
सुरणाचे फायदे
१. सुरणामधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.तसेच नियमित सेवनाने बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.
२. सुरणामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीसारख्या तक्रारींवर सुरण खाणे फायदेशीर ठरते.
३. यातील फायबरमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास आणि मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
४. सुरणामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळते.ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
५. सुरणामधील मॅग्नेशियम आणि फॉस्फरस घटक हाडांना मजबूत करण्यास मदत करतात. तसेच शरीर डिटॉक्सिफाई करण्यात आणि अशुद्धता कमी करण्यास मदत करतात.