Join us  

भाजून-उकडून मका नेहमीच खातो, ट्राय करा मक्याचे खमंग थालिपीठ, सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 11:46 AM

Sweet Corn Thalipith Recipe : घरातली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे थालिपीठ कसे करायचे पाहूया...

ठळक मुद्देब्रेकफास्ट किंवा रात्रीच्या जेवणाला काय करायचे असा प्रश्न पडला असेल तर उत्तम पर्यायपावसाळ्यात स्वस्तात मस्त मिळणाऱ्या कॉर्नचा चमचमीत पदार्थ

पावसाळ्याच्या दिवसांत बाजारात मक्याची कणसं मोठ्या प्रमाणात दिसतात. बाहेर मुसळधार पाऊस आणि भाजलेले गरमागरम गोड कणीस हे कॉम्बिनेशन भन्नाट आहे. या काळात बाजारात कणसं अगदी स्वस्तात मस्त मिळतात. अशावेळी कणीस भाजून, उकडून तर खातोच पण त्याचे वेगळे काही करता आले तर? कॉर्न भेळ, कॉर्न पॅटीस, कॉर्न भजी यांबरोबरच कणसाचे थालिपीठही खूप छान आणि चविष्ट होते. मुलांना सतत वेगळं आणि चविष्ट काहीतरी हवं असतं आणि आईचा मुलं जे खातील ते पौष्टीक असावं असा अट्टाहास असतो. मक्याच्या कणसाचे थालिपीठ करायला सोपे आणि अतिशय चविष्ट लागते. रोज ब्रेकफास्टला काय करायचे असा प्रश्न तर आपल्यापुढे असतोच पण दुपारी भाजी-पोळी खाल्ली की रात्रीच्या वेळी पुन्हा तीच भाजी-पोळी खाणेही नको वाटते. अशावेळी ही गरमागरम थालिपीठ हा उत्तम पर्याय ठरु शकतो. झटपट होणारे आणि घरातली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे थालिपीठ कसे करायचे पाहूया (Sweet Corn Thalipith Recipe)...

(Image : Google)

साहित्य - 

१. मक्याचे कणीस - २ ते ३ 

२. गव्हाचे पीठ - २ वाट्या

३. तांदळाचे पीठ - अर्धी वाटी

४. आलं-मिरची-लसूण पेस्ट - १ ते १.५ चमचा

५. मीठ - चवीनुसार 

६. कोथिंबीर - अर्धी वाटी चिरलेली

७. धनेजीरे पावडर - १ चमचा

(Image : Google)

कृती - 

१. कणीस धुवून किसून घ्यायचे किंवा दाणे काढून मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यायचे.

२. यामध्ये बसेल इतके गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालायचे. 

३. आलं-मिरची-लसूण पेस्ट, धनेजीरे पावडर, मीठ, कोथिंबीर घालायचे.

४. थोडेसे घट्टसर पीठ हाताने मिक्स करायचे. 

५. तव्यावर तेल घालून थालिपीठ थापून घ्यायचे आणि झाकण ठेवून होऊ द्यायचे. 

६. एका बाजूने खरपूस भाजले गेले की उलटून दुसऱ्या बाजूने भाजायचे.  

७. हे थालिपीठ तूप, सॉस, दही, लोणचे कशासोबतही छान लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.