Join us  

फक्त २ ब्रेड स्लाइस आणि कपभर दूध, १० मिनिटात परफेक्ट स्वीट डिश तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2023 4:49 PM

Sweet Dish of Milk and Bread Easy Recipe : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा या रेसिपीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर कुणाल यांनी शेअर केला असून ती कशी करायची पाहूया..

कधीतरी आपल्याला अचानक खूप गोड खावस वाटतं. एकदम एनर्जी डाऊन झाल्यासारखं होतं आणि गोड खायची इच्छा होते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर काही वेळा कडक उन्हात फिरल्याने एकदम थकवा आल्यासारखे वाटते. अशावेळी पटकन काहीतरी गोड खाल्ले तर थोडी एनर्जी येईल असे वाटते. मात्र अशावेळी आपल्या घरात गोड काही असेलच असं नाही. पण २ ब्रेड स्लाइस आणि दूध असेल तर आपण त्यापासून झटपट एक स्वीट डिश तयार करू शकतो. ही डीश करायला अतिशय सोपी असून अगदी ५ मिनीटांत तयार होणारी असल्याने आपली गोड खायची इच्छा लगेचच पूर्ण होऊ शकते. प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी ही चविष्ट रेसिपी शेअर केली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा या रेसिपीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर कुणाल यांनी शेअर केला असून ती कशी करायची पाहूया (Sweet Dish of Milk and Bread Easy Recipe)..

साहित्य -

१. ब्रेड स्लाइस - २

२. दूध - १.५ कप

३. साखर - २ चमचे

४. तूप किंवा बटर - १ चमचा 

५. टूटी फ्रूटी - २ चमचे

६. कस्टर्ड पावडर - १ चमचा

कृती - 

१. पॅनमध्ये तूप घालून ब्रेड स्लाइस दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून घ्यायचे.

(Image : Google)

२. हे भाजलेले स्लाइस एकमेकावर ठेवून या स्लाइसवर १ कप दूध घालायचे आणि ते मध्यम गॅसवर चांगले उकळू द्यायचे.

३. ब्रेडवर आणि दुधात साखर घालायची. ब्रेड दुधात भिजले गेले नसतील तर चमच्याने त्यावर बाजूचे दूध घालायचे.

४. एका बाऊलमधे १ चमचा कस्टर्ड पावडर घेऊन त्यामध्ये पाव ते अर्धा कप दूध घालून ते चांगले मिसळून घ्यायचे.

५. कस्टर्ड पावडरचे हे मिश्रण पॅनमधील ब्रेडवर घालायचे. सगळे पुन्हा चांगले शिजवून घ्यायचे.

६. कस्टर्ड पावडरमुळे दुधाला घट्टपणा येतो आणि हे सगळे ब्रेड स्लाइसमध्ये चांगले मुरले जाते. 

७. गॅस बंद करून यावर टूटी फ्रुटी घालायची आणि मिश्रण गार होऊ द्यायचे. 

८. थंड झाल्यावर चमच्याने हे छान मुरलेले ब्रेडचे डेझर्ट खायचे. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.