प्रतिभा जामदार
मोदक गोडच असतात, साखर-गुळ घालून आपण नेहमीच मोदक करतो. पण हे नाचणीचे उकडीचे मोदक, साखर किंवा गुळ अजिबात न वापरता करता येतात. चवीला सुरेख आणि सुकामेवा घालून केलेले असल्यानं तब्येतीला उत्तम.
कसे करतात नाचणीचे उकडीचे मोदक, ते ही साखर-गुळ अजिबात न घालता?
(छायाचित्र: प्रतिभा जामदार)
साहित्य
१ वाटी नाचणीचे पीठ, पाव वाटी तांदूळ पिठी, १ वाटी खजुर, पाऊण वाटी काजू, बदाम, मनुका आणि अक्रोडचे तुकडे.
१ वाटी ओल्या नारळाचे खवलेले खोबरे, साजूक तूप, मीठ
वेलदोडा पूड.
(छायाचित्र: प्रतिभा जामदार)
कृती
नाचणी आणि तांदुळाचे पीठ मिक्स करून घ्यावे.
जितके पीठ तितकंच पाणी म्हणजे सव्वा वाटी पाणी उकळत ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ आणि १ चमचा साजूक तूप घालून पाण्याला उकळी आणावी. उकळलेल्या पाण्यात पीठ घालून ढवळून झाकून गार करायला ठेवून द्यावे. एका पॅनमध्ये २ चमचे साजूक तूप घेऊन गरम करून त्यात बिया काढून बारीक चिरलेला खजूर घालून तो तुपावर परतवून मऊ करून घ्यावा. खजूर मऊ झाला की त्यात ओले खोबरे घालून मंद गॅसवर मिश्रण एकजीव करून घ्यावे. मिश्रणात वेलदोडा पूड आणि ड्रायफ्रूट घालून छान परतून मिश्रण एकजीव करून थंड करायला ठेवावे.
थंड झालेली पिठाची उकड गरजेनुसार थंड पाणी घालून मऊ मळून घ्यावी. पिठाचा छोटा गोळा बनवून अंगठा आणि तर्जनी च्या सहाय्याने खोलगट वाटी बनवून त्यात सारण भरून वाटीला पाकळ्या तयार करून घ्याव्यात. या मोदकाच्या पाऱ्या अलगद एकत्र जोडत वतीने तोंड बंद करून मोदकाचा आकार द्यावा.
मोदकपात्र किंवा पातेल्यात पाणी उकळून त्यावर चाळण ठेवून हे मोदक ठेवून, त्यावर झाकण ठेवून १० मिनिटे वाफवावेत.
उकडलेल्या मोदकांना तुपाचा ब्रश फिरवून गंध, चव आणि चमक आणावी.
आपले नाचणीचे उकडीचे मोदक तयार.
( प्रतिभा जामदार यांच्या अशाच उत्कृष्ट पाककृती संध्याई किचन या युट्यूब चॅनलवर पाहता येतील.)