थंडीचे दिवस म्हटले की आपल्याला सतत गरमागरम आणि चमचमीत काहीतरी खावसं वाटतं. सारखं सूप, आमटी, सार या गोष्टी पिऊन कंटाळा आलेला असतो. शरीराला उष्णता मिळण्यासाठी आणि घशाला आराम मिळण्यासाठी आपण सगळेच चहा, कॉफी, सूप, गरमागरम कढण असे काही ना काही आहारात घेत असतो. आहारातील महत्त्वाचा पदार्थ असलेले दही आणि ताक थंडीच्या दिवसांत नको वाटते. अशावेळी दह्याची कढी हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. दह्याचे ताक आरोग्यासाठी अतिशय चांगले असते पण थंडीत ते पीणे शक्य नसल्याने ताकाची गरमागरम कढी अतिशय उत्तम लागते (Tak dahi kadhi Recipe cooking tips).
घशाला शेक मिळण्यासाठीही त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. आपल्याकडे गोळ्यांची कढी, शेवगा घालून केलेली कढी, मेथीची कढी असे एकाहून एक चविष्ट प्रकार केले जातात. मूगाच्या डाळीची खिचडी आणि कढी हा तर आपल्याकडे रात्रीच्या वेळी आवर्जून केला जाणारा बेत. मात्र ही कढी काहीवेळा फुटते. यातील दही आणि पाणी वेगवेगळे होते. अशी फुटलेली कढी एकसंध न झाल्याने चवीलाही चांगली लागत नाही. पण कढी फुटू नये आणि चांगली व्हावी यासाठी आज आपण एक सोपा उपाय पाहणार आहोत. प्रसिद्ध शेफ सरीता पद्मन यांनी हा उपाय सांगितला असून तो नेमका काय आणि कसा करायचा पाहूया...
कढी फुटू नये म्हणून उपाय काय?
आपण कढीसाठी दही घेतो, त्यामध्ये डाळीचे पीठ, साखर, मीठ आणि पाणी घालून हे सगळे मिश्रण रवीने एकजीव करतो. त्यानंतर आपण फोडणीत जीरे, कडीपत्ता, मिरची, मेथ्या, हिंग घालून छान फोडणी देतो. या फोडणीत आपण दह्याचे एकजीव केलेले मिश्रण घालतो आणि उकळी आणतो. पण असे केल्याने बरेचदा कढी फुटते. म्हणूनच दह्याचे मिश्रण करताना त्यामध्ये मीठ घालू नये. फोडणीत मिश्रण घालून उकळी आल्यावर गॅस बंद करावा. त्यानंतर वरुन मीठ घालून कढी ढवळून एकजीव करावी. उकळी आल्यानंतर मीठ घातल्याने कढी अजिबात फुटत नाही आणि छान एकसंध-चविष्ट होते.