भाऊबीज म्हणजे भाऊरायाचे कौतुक करायचा, त्याला गोंजाराचा दिवस. आपल्या मागे कायम खंबीरपणे उभ्या असणाऱ्या भावाला प्रेमाने ओवाळणारी बहिण तितक्याच मायेनं त्याची काळजीही घेत असते. भावाल दिर्घायुष्य मिळावे आणि त्याचे आरोग्य चांगले राहावे यासाठी बहिण प्रार्थना करते आणि त्याला ओवाळते. भाऊ ओवाळणी म्हणून आपल्या बहिणीला तिच्या आवडीचे गिफ्ट देतो. हल्ली बहीणीही भावाला काही ना काही गिफ्ट देतात. आता आपल्या या लाडक्या भावाला आजच्या स्पेशल दिवशी खूश करायचे असेल तर त्यासाठी खास बेत नको का करायला. चला तर मग पाहूया एक खास आणि हेल्दी मेन्यू जो खाल्ल्यानंतर तुमचाही भाऊ नक्कीच खूश होईल...
१. आमसूल सार - करायला अतिशय सोपे आणि हेल्दी असे हे सार सगळ्या वयोगटातील लोकांसाठी उत्तम आहे. थंडीच्या दिवसांत गरमागरम सार प्यायल्याने तुम्हाला घशाला आराम मिळू शकतो. आमसूल आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. तूपात जिऱ्याची फोडणी देऊन त्यात पाणी घालावे. त्यात आमसूल, तिखट, मीठ आणि साखर घालावे. हे आंबट-गोड सार चवीला अतिशय छान लागते.
२. पनीर पराठा - पनीर हा सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ तसेच पनीरमधून शरीराला मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळत असल्याने पनीर खाल्लेले चांगले. पनीर किसून त्यामध्ये आलं, मिरची लसूण पेस्ट घालावी, त्यात धने-जीरे पूड, हिंग, हळद घालावी. भरपूर कोथिंबिर घालावी. पुरणपोळीसाठी ज्याप्रमाणे आत पुरण भरुन पोळी करतो त्याचप्रमाणे हे सारण कणकेत भरुन पराठा करावा. हा पराठा अतिशय टेस्टी तर लागतोच आणि हेल्दीही असतो.
३. मसालेभात - मसालेभात हा कधीही सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ. तुमच्याकडे तोंडली असतील तर तुम्ही ती यामध्ये घालू शकता. याबरोबरच दाणे, खडा मसाला आणि वरुन खोबरं-कोथिंबिर घातल्यावर हा भात अतिशय रुचकर लागतो. या भातासोबत खायला पापड-कुरडई तळल्यास आणखी उत्तम.
४. चटणी - पराठ्यासोबत दही आवडत असेल तर दही द्यावे अन्यथा खोबऱ्याची चटणी करु शकता. यामध्ये भरपूर ओलं खोबरं, कोथिंबिर, लसणाच्या पाकळ्या, थोडं दही, साखर, मीठ, मिरची घालून मिक्सर करावे.
५. फ्रूट सलाड - लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणता येईल असा पदार्थ म्हणजे जेवणातील सगळ्यात महत्त्वाचा गोड पदार्थ. घरच्या घरी सहज करता येणारे फ्रूट सलाड हा हेल्दी पदार्थ तुम्ही नक्की करु शकता. यासाठी फळं, दूध, कस्टर्ड आणि साखर या गोष्टींची गरज असते. बाजारात सध्या उपलब्ध असणारी फळं बारीच चिरुन ठेऊन त्यात कस्टर्ड आणि दूध घालावे. आवश्यकता असल्यास त्यात थोडी साखर घालावी. हे फ्रूट सलाड फ्रिडमध्ये ठेवल्यास ते छान सेट होते आणि गारेगार खायलाही छान लागते. अजून म्हणावी तितकी थंडी पडली नसल्याने तुम्ही हा पदार्थ नक्की खाऊ शकता. तसंच यामुळे फळंही पोटात जातात.