पाऊस म्हटला की चहा आणि भजी आठवतात त्याचप्रमाणे आपल्याला आणखी एक गोष्ट आठवते ती म्हणजे मक्याचे कणीस. पावसाच्या गारठ्यात गरमागरम कणीस समोर आलं की आपण त्याच्यावर अगदी सहज ताव मारतो. या भाजलेल्या किंवा उकडलेल्या कणसाला लिंबू, मीठ आणि थोडं तिखट लावलेलं असेल तर मग काही विचारायलाच नको. ॲण्टी ऑक्सिडंट्स सोबतच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा उत्तम स्त्रोत म्हणून स्वीटकॉर्न ओळखले जाते. त्यामुळे पावसाळ्यात मुबलक प्रमाणात मिळणारे स्वीटकॉर्न आवर्जून खायला हवे.
अगदी पोट डब्ब भरेपर्यंत आपण हे कणीस खातो. मूळात गोड असणाऱ्या या कणसाला थोडी आंबट-तिखट चव आल्याने त्याची लज्जतच वाढते. असं हे कणीस नेहमीच्या पद्धतीने खाण्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने खाल्लं आणि त्याला छान फ्लेवर दिला तर मग त्याची रंगत आणखीनच वाढते. असंच थोडं वेगळ्या चवीचं आणि तंदूरी स्टाईल कणीस कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत. पावसाळी हवेमुळे सारखी भूक लागते, अशात दिवसाच्या कोणत्याही वेळेला अगदी झटपट करता येणारी ही रेसिपी पाहूया (Tandoori Style Corn Recipe Monsoon Special)....
झटपट होणारी सोपी रेसिपी
१. साधारण १ वाटी दही घेऊन ते चांगले फेटायचे. त्यामध्ये मीठ, मीरपूड, १ चमचा तिखट, जीरे पूड आणि आलं लसूण पेस्ट घालून हे चांगलं एकजीव करुन घ्यायचे.
२. बाजारात मिळणारे ताजे २ कणीस घेऊन त्याची वरची साले आणि दशा काढून ही कणसं साधारण ७० टक्के उकडून घ्यायची.
३. त्यानंतर या उकडलेल्या कणसांवर दह्याचे केलेले मिश्रण सगळ्या बाजूने व्यवस्थित लावायचे आणि हे कणीस गॅसवर चांगले भाजून घ्यायचे.
४. या भाजलेल्या गरम कणसावर चाट मसाला किंवा लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची आणि फ्लेवर येण्यासाठी बटर लावायचे.
५. असे वेगवेगळे सोपस्कार केलेले हे कणीस चवीला थोडे स्मोकी आणि चविष्ट अतिशय छान लागते.
कणीस खाण्याचे फायदे
१. स्वीटकॉर्न खाल्ल्यामुळे दात खूपच मजबूत होतात. त्यामुळे लहान मुलांनाही पावसाळ्यात स्वीटकॉर्न खायला दिले पाहिजे.
२. मुतखडा म्हणजेच किडनी स्टोनचा त्रास आहे, त्यांनी पावसाळ्यात मका खाणे कधीच चूकवू नये.
३. फॉलिक ॲसिडचा उत्तम स्त्रोत असल्याने गर्भवतींनी आवर्जून खायला हवं. फॉलिक ॲसिडमुळे कर्करोगाचाही धोका कमी होतो.
४. स्वीटकॉर्न जर शिजवून खाल्ले तर त्यातील ॲण्टी ऑक्सिडंट्सचे प्रमाण दुपटीने वाढते, अँटीएजिंगसाठी अतिशय फायदेशीर असते.
५. मॅग्नेशियम, लोह, कॉपर, विटामिन बी, फॉस्फरस असे अनेक घटक स्वीटकॉर्नमधून मिळतात.