Join us  

२ वाट्या तांदुळात होतील ५० पापड्या, मस्त फुलणाऱ्या तांदुळाच्या पापड्यांची पारंपरिक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2023 3:40 PM

Tandul Papdi Recipe Home made Rice Papad : तोंडात घातल्या की सहज विरघळतील अशा तांदळाच्या पापड्यांची सोपी रेसिपी..

उन्हाळ्याच्या दिवसांत पूर्वी आवर्जून वाळवणं केली जायची. कडक उन्हाचा चांगला उपयोग करुन वर्षभर टिकतील अशी ही वाळवणं म्हणजे जेवणात तोंडी लावण्याचा एक छान पर्याय. जेवणात तळण असेल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच जेवण छान जाते. आमरस किंवा गोडाचे जेवण असले, अचानक पाहुणे येणार असतील  की ताटाची शोभा वाढवणारे हे तळण असले तर तारांबळ होत नाही. उन्हाळ्याचा दिवस मोठा असल्याने आणि ऊन चांगले असल्याने कमीत कमी साहित्यात झटपट होणाऱ्या या तांदळाच्या पापड्या अतिशय छान लागतात. वर्षभर वापरता येतील अशा या वाफवून केल्या जाणाऱ्या तांदळाच्या पापड्या होतातही अगदी झटपट. पाहूयात भरपूर फुलणाऱ्या तोंडात घातल्या की सहज विरघळतील अशा तांदळाच्या पापड्यांची सोपी रेसिपी (Tandul Papdi Recipe Home made Rice Papad)...

साहित्य - 

१. तांदूळ - ३ ते ४ वाट्या 

२. पापड खार - अर्धा चमचा

३. मीठ - १ चमचा

४. तीळ - १ चमचा 

५. जीरे - अर्धा चमचा 

६. तेल - पाव वाटी

कृती - 

१. तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे.

२. सकाळी उठल्यावर अगदी कमी पाणी घालून हे तांदूळ मिक्सरमध्ये अगदी पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचे. जितके वाट्य़ा तांदूळ तितकेच पाणी घालून ही पेस्ट तयार करायची.

३. या मिश्रणामध्ये पापड खार, मीठ, जीरे आणि तीळ घालून पीठ चांगले एकजीव करुन घ्यायचे.

४. घरात लहान आकाराच्या ज्या प्लेटस असतात त्याला तेल लावून हे पीठ पातळसर पसरुन घ्यायचे.

५. एका मोठ्या पातेल्यात पाणी तापायला ठेवायचे, त्यावर एक चाळणी ठेवून त्यामध्ये या तांदळाचे पीठ घातलेल्या प्लेटस ठेवायच्या. 

६. अवघ्या अर्ध्या मिनीटातच या पापड्या शिजतात. त्यामुळे अर्धा मिनीट झाला की या प्लेटस बाहेर काढायच्या.

७. त्यानंतर पापडीच्या कडा मोकळ्या करुन प्लेटसमधून पापड्या काढायच्या आणि कापडावर किंवा प्लास्टीकवर पापड्या उन्हात वाळवायच्या. 

८. दोन ते तीन दिवस चांगले ऊन दिल्यावर पापड्या कडक वाळतात आणि तेलात टाकल्या की दुप्पट आकाराच्या फुलतात. आमटी भात, खिचडी किंवा जेवणात कशासोबतही या पापड्या फार छान लागतात. 

टॅग्स :अन्नपाककृती