बाजारात काळी जांभळी भरताची वांगी बघितली की तोंडाला पाणी सुटतं. थंडीच्या दिवसात वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी या दोन गोष्टीतही दुपारच्या जेवणाच बेत छान होतो. पण संध्याकाळच्या जेवणालाही हे भरताचं वांगं छान सोबत करु शकतं. भरताच्या वांग्याची रस्सा भाजी. भरताच्या वांग्याचं केवळ भरीतच होतं असं नाही तर मोजक्या मसाल्यांचा वापर करुनही छान झणकेदार रस्सा भाजी होते. या भाजीसाठी लागतात फक्त तीन गोष्टी.. भरताचं वांगं, कांदा आणि टमाटा.. बाकी मसाले लागतात मोजकेच. उपलब्ध असलेल्या मसाल्यातही ही भाजी छान होते. कमी कष्टात चवदार भाजी म्हणजे भरताच्या वांग्याची रस्सा भाजी.
Image: Google
कशी करायची भरताच्या वांग्याची रस्सा भाजी?
भरताच्या वांग्याची रस्सा भाजी करण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीची यादी फारच लहान आहे. 2 मोठी भरताची वांगी, 3 मोठे टमाटे उभे कापलेले, 2 मोठे कांदे उभे चिरलेले, सूर्यफूल तेल, 1 चमचा तिखट, चवीपुरतं मीठ, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड आणि कोथिंबीर घ्यावी.
Image: Google
एका कढईत नेहमीच्या भाजीला घेतो त्यापेक्षा जास्त सूर्यफुलाचं तेल घ्यावं. ते तापलं की त्यात कांदा घालावा. तो तेलात जरासा हलवला, की पाण्यात बुडवलेल्या वांग्याच्या फोडी घालाव्यात. कांदा आणि वांगाच्य फोडी तेलात छान परतून घ्याव्यात. सर्व फोडींना व्यवस्थित तेल लागलं, की त्यात एक चमचा तिखट आणि थोडं मीठ घालावं. तिखट आणि मीठ नीट मिसळून घेतलं , की गॅसची आच मंद करावी. कढईवर झाकण ठेवावं. 15-20 मिनिटं कढईवरचं झाकण न काढता वांग्याच्या फोडी शिजू द्याव्यात. तेवढ्या वेळात भात लावून द्यावा.
Image: Google
भाजीच्या कढईवरचं झाकण काढून फोडी चांगल्या हलवून घ्याव्यात, यात चिरलेला टमाटा घालावा. टमाटा भाजीत चांगला परतून घ्यावा. टमाटा परतताना गॅसची आच थोडी मोठी करावी. टमाटा परतला गेला की मंद आचेवर भाजी परतत राहावी. टमाटा चांगला मऊ आणि एकजीव होईपर्यंत परतावा. साधारणत: 10 मिनिटात टमाटा भाजीत एकजीव होतो. टमाटा भाजीत चांगला शिजला की त्यात पुन्हा थोडं तिखट आणि मीठ घालून भाजी हलवून घ्यावी. कांदा आणि टमाटा शिजून भाजीला ग्रेव्ही धरते. पण आणखी थोडी पातळ हवी असल्यास थोडं गरम पाणी घालावं. भाजीला मध्यम आचेवर उकळी येवू द्यावी. भाजीचा गॅस बंद करण्याआधी त्यात थोडी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालावी. भाजी एकदा चांगली हलवून गॅस बंद करावा. वरुन कोथिंबीर पेरावी. गरम भातासोबत भरताच्या वांग्याची ही रस्सा भाजी मस्त चव आणते.