शुभा प्रभू साटम
लहानपणी शहरात जरी राहत असलो तरीदेखील पिताश्री मनाने अस्सल कोकणी! चहा चपाती किंवा आंबा चोखुनच खायचा, अश्या ट्रेटमधून ते जाणवायचे.त्यातही चहा चपाती. गरिबाला परडवणारा पदार्थ आहे हे लॉजिक इथे मोठे. आणि अनेकांशी खरे आहे. मोठे कुटुंब, कामावर जायची घाई आणि गरिबी.. त्यामुळे कडकडीत चहा आणि सोबत चपाती बुडवून खाल्ली की झाले. ब्रेड, बटर ,पोहे , इडली, डोसे, आंबोळी हे क्वचित. आई वडील गावठी आहेत असे वाटण्याचे जे वय असते, त्यात मी होते, त्यामुळे नाक मुरडून टिंगल करणे व्हायचे.पुढे मात्र अनुभवांच्या कक्षा विस्तारल्या आणि बाबांची ट्रेडमार्क चहा चपाती अनेक ठिकाणी खाल्ली जाते, हे आढळले. थोडीफार सामाजिक जाणीव होत होती, आणि तेव्हा या जोडगोळी मागील आर्थिक/ सामाजिक गणित पटले.चपाती किंवा भाकरी नाश्त्याला चहा बरोबर खाणे, हे ग्रामीण शहाणपण आहे. शिळ्या किंवा ताज्या चपात्या..(आणि चपात्याच,पोळ्या खाणारा वर्ग हे कॉम्बिनेशन क्वचित वापरणारा) आणि चहा. पोटभर. इथे महाराष्ट्र सोडा..पंजाब, हरयाणा, राजस्थान अश्या जागी नेहेमी पराठे खाल्ले जात असतीलअशी समजूत असेल, तर चूक आहे. घरचे लोणी, लोणचे आणि भरभक्कम रोटी हाच खरा खुराक असतो.रोटी नसेल तर भाकरी. लांब का जाता, कोळी -आगरी समाजातही अनेक बांधवभगिनी रात्रीची तांदूळ भाकरी अनेकदा सकाळी न्याहारी म्हणून खातात.हे अस्सल व्यवहारातलं शहाणपण. न्याहारी तर हवीच. पण नाश्त्याचे चोचले नकोत. त्यामुळे सोपं आणि पटकन, स्वस्त असं खाणं व्हायचं. ते रुळलं.
(छायाचित्र-गुगल)
गंमत अशी की या चहा चपातीला. नाक मुरडणारे मैद्याचा पाव - बिस्किटे आणि प्रीझरव्हेटिव्ह घातलेलं केचप सॉस याला फॅशन म्हणतात.हे रामायण सांगायचे कारण की पुण्यात एफ सी रोडवर चहा चपाती देणारे ठिकाण चालू झाले आहे. त्याची चर्चा झाली, सोशल मीडीयात चहा-चपाती व्हायरल झाले.पण त्यापलिकडे यात काय दिसतं तर कोरोनाने अनेक धडे दिले त्यात आपली मुळे (going back to roots चे भाषांतर.) तपासून पाहणे वाढलेय आणि अकारण फुगलेली आयुष्यशैली, तिचे दुष्परिणाम दिसू लागलेत. कुठेतरी पूर्वजांचे आयुष्य धोरण पटू लागले आहे. खानपानातलं पारंपरिक शहाणपण कळू लागलं आहे.इराणी बन मस्का चालतो आवडतो मग चहा चपाती का नाही असा प्रश्नही रास्तच आहे.चहा चपाती चर्चेत आली, पिढ्यांपिढ्या घरोघर चहा चपाती खाणारेही त्यानिमि्त्तानं सुखावले असतील..चहा चपाती हे दोन शब्द नाही, मनोसामाजिक आणि खाण्यापिण्याच्या आठवणी म्हणूनही बरंच काही दडलं आहे त्यात!
(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)