हरबऱ्याची जुडी घरात आणली की भाजीलाही हरबरे मिळत नाही. भाजी करण्याआधीच जुडीवरचे हरबरे सोलून खाऊन फस्त झालेले असतात. ताज्या हरबऱ्यांची ऊसळ, चटणी, समोसे असे विविध पदार्थ केले जातात आणि हिवाळ्यात अगदी थोडा काळ मिळणाऱ्या हरबऱ्यांचा आस्वाद घेतल जातो. ताज्या हरबऱ्यांपेक्षाही हरबऱ्याचा ताजा पाला तर त्याहूनही कमी काळ मिळतो आणि तोही ओल्या हरबऱ्यांइतकाच चविष्ट लागतो. हरबऱ्याचा ताजा पाला खाण्याला आरोग्याच्यादृष्टीने विशेष महत्त्व आहे.
प्रसिध्द आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी नुकत्याचा एका भाजीचा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. ही आपल्या हरवलेल्या भाजींच्या यादीतली पौष्टिक आणि रुचकर भाजी असल्याचं ऋजुता दिवेकर सांगतात. काळाच्या ओघात अनेक पौष्टिक पदार्थांचा आपण हात सोडला त्यातली हरबऱ्याच्या पानांची भाजी ही एक आहे.
जे शेतकरी हरबऱ्याची शेती करतात किंवा प्रामुख्याने खेडेगावात आजही हरबऱ्याच्या पानांची भाजी याकाळात केली जाते आणि आवर्जून खाल्ली जाते. गावपातळीवर ही भाजी, तिचं महत्त्व शहरांच्या तुलनेत अजूनही टिकून आहे. हिवाळ्याच्या दिवसात विशेषत: हरभरे पिकवण्याच्या काळात खेडेगावात कोणी पाहुणा अचानक आला तर त्यांच्यासाठी शेतातून ताजा ताजा हरबऱ्याचा पाला आणून त्याची भाजी आणि सोबत भाकरीचा गावरान बेत केला जातो. तर गावखेड्यात हा पाला वाळवून ठेवतात. आणि उन्हाळा पावसाळ्यात या पानांना बाजरी किंवा ज्वारीच पीठ लावून त्याची पातळ आमटी करतात आणि त्यात भाकरी मोडून खातात.
हिवाळ्याच्या काळात अगदी थोडा काळ हरबऱ्याच्या पानांची जुडी किंवा वाटा मिळतो. हरबऱ्याची पानं गुणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाची असतात. ते कसे हे समजून घेतले तर हरबऱ्याचा कोवळा ताजा पाला आवर्जून शोधून घरात आणला जाईल आणि त्याची भाजी/ आमटी केली जाईल हे नक्की!
Image: Google
काय असतं हरबऱ्याच्या कोवळ्या पानांमध्ये?
हरबऱ्याची पानं चवीला आंबट आणि तुरट असतात. नुसती पानं थोडावेळ चावून खाल्ली तरी तोंडाला चव येते. हरबऱ्याची कोवळी ताजी पानं खाणं किंवा हरबऱ्याची पानं वाळवून ती भाजी वापरणं किंवा त्यंची आमटी करुन खाण्यास पौष्टिक मूल्यं आहे. हरबऱ्याच्या पानांचा समावेश आहारात केल्यास त्यामुळे आतड्यांची स्वच्छता होते. आतड्यात साचलेले विषारी घटक बाहेर पडून पचन सुधारण्यास, चयापचय क्रिया गतिमान करण्यास मदत होते. हिवाळ्यात हरबऱ्याच्या पानांची भाजी खाल्ल्यास पोटावरची चरबी कमी होते. पित्ताचा त्रास, पित्तज्वर या समस्या कमी होतात. हिरड्यांवरची सूज नाहिशी होते. हरबऱ्याच्या ताज्या पानांमधे लोहाचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे ॲनेमिया कमी होण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो. रक्तातील हिमोग्लोबीनचं प्रमाण हरबऱ्याची कोवळी ताजी पानं खाल्ल्याने वाढतं. कुपोषण कमी करण्यासाठी हरबऱ्याच्या ताजा पानांचं महत्त्व आहे. 2013 मधे 'जर्नल ऑफ द सायन्स ऑफ फूड ॲण्ड ॲग्रिकल्चर'मध्ये प्रसिध्द झालेला अभ्यास सांगतो की, हरबऱ्याच्या पानात खनिजांचं आढळून येणारं प्रमाण हे पालक आणि पत्ताकोबी यात आढळणाऱ्या खनिजांपेक्षा जास्त असतं. हरबऱ्याचा पाला चविष्टरित्या खाण्यासाठी हरबऱ्याच्या पानांची दाण्याचा कूट लावून कोरडी भाजी, डाळ किंवा ताजे वाटाणे घालून केलेली भाजी, हरबऱ्याची पानं वाळवून झणकेदार आमटी, पानांना दही लावून होणारी स्वादिष्ट कढी असे रुचकर पर्याय करता येतात. यामुळे जेवणाची चव तर वाढतेच सोबत आरोग्याला पानांतील पौष्टिक गुणधर्मांचा फायदा मिळतो.
Image: Google
हरबऱ्याच्या पानांची कढी
हरबऱ्याच्या पानांची कढी करताना पाव कप बेसनपीठ, पाव कप आंबट दही, पाव कप हरबऱ्याची ताजी पानं, 1 मोठा चमचा भाजीचे वडे ( मूग/ हरभरा/ मिश्र डाळींचे भाजीचे वडे , 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1 मोठा चमचा बारीक कापलेला लसूण, दीड चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा धने पावडर आणि मीठ घ्यावं.
कढी करताना आधी हरबऱ्याच्या जुडीतली कोवळी ताजी पानं निवडून घ्यावीत. दही फेटावं. त्यात बेसन घालून ते चांगलं मिसळून घ्यावं. प्रेशर कुकरमधे तेल घालावं. तेल गरम झालं की त्यात मोहरी, जिरे आणि हिंग घालावा. लगेचच लसूण घालून तो लालसर परतून घ्यावा.त्यात दह्यात बेसन कालवलेलं मिश्रण घालावं. त्यातच हळद, तिखटासह सर्व मसाले घालावेत. ते चांगले मिसळून घ्यावेत. यात दोन ते अडीच कप पाणी घालून मिश्रणाला उकळी येवू द्यावी. उकळी आली की त्यात ओबडधोबड कुटलेले भाजीचे वडे घालावेत. वडे मिश्रणात हलवून घेतले की त्यात हरबऱ्याचा स्वच्छ धुवून ठेवलेला पाला घालावा. मीठ घालून मिश्रण चांगलं ढवळावं. नंतर कुकरला झाकण लावून तीन शिट्या काढाव्यात. गॅस मंद आचेवर ठेवून पाच मिनिटं ते शिजू द्यावं. नंतर गॅस बंद करावा. वाफ गेली की हरबऱ्याच्या पानांची कढी मक्याच्या किंवा इतर कोणत्याही भाजीसोबत खावी.
Image : Google
हरबऱ्याच्या पानांची कोरडी भाजी
हरबऱ्याच्या पानांची कोरडी भाजी करताना पाव कप हरबऱ्याची कोवळी ताजी पानं , 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, 4-5 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या, पाव चमचा हिंग, मोठा कांदा जाडसर चिरलेला, 3 उभे काप केलेल्या हिरव्या मिरच्या, 3 मोठे चमचे खोवलेला नारळ आणि चवीपुरती मीठ एवढी सामग्री घ्यावी.
Image: Google
भाजी करण्यासाठी हरबऱ्याच्या जुडीतला ताजा पाला घ्यावा. पाला धुवून चिरुन घ्यावा. कढईत तेल तापवावं. त्यात मोहरी, जिरे फोडणीला घालावे. ते तडतडले की त्यात कांदा आणि लसूण घालून तो परतून घ्यावा. हिंग आणि हिरवी मिरची घालून ती फोडणीत परतावी. हरबऱ्याची पानं बारीक करुन ती मध्यम आचेवर परतावी. कढईवर झाकण ठेवून भाजी वाफवावी.
भाजी शिजली की त्यात मीठ घालावं. सर्वात शेवटी भाजीला खोवलेलं खोबरं लावून भाजी नीट हलवून घ्यावी. खोबरं घातल्यानंतर भाजी एक मिनिट परतून घ्यावी. ही पोळी किंवा भाकरीसोबत छान लागते. हरबऱ्याच्या पानांची भाजी बटाटे घालून, हरबरा किंवा मुगाची डाळ भिजवून ती घालून केली जाते. कोरड्या भाजीला बेसन पीठ थोडं भाजून घेवून ते लावलं तरी चालतं.
हरबऱ्याची पानं निवडावी. ती धुवून सुकवावी आणि सुकलेली पानं डब्यात भरुन ठेवावी. ती आमटीत कसूरी मेथीसारखी चुरुन घालता येतात. किंवा या कोरड्या पानाचीही आमटी करता येते.
Image: Google
हरबऱ्याच्या कोरड्या पानांची आमटी
हरबऱ्याची पानं वाळवून घ्यावी. वाळलेली पानं हातावर घासून घ्यावी. एक मोठा कप हरबऱ्याची कोरडी पानं असल्यास त्यात दोन मोठे चमचे बाजरीचं/ ज्वारीचं पीठ घालून ते पानांमधे मिसळून घ्यावं.
कढईत थोडं तेल घ्यावं. ते तापलं की त्यात मोहरी आणि जिरे घालावेत. ते तडतडले की 3-4 सुक्या लाल मिरच्या , 2-3 लसणाच्या पाकळ्या घालून केलेलं वाटण घालावं. ते परतलं गेलं की त्यात थोडं पाणी घालावं. पाण्याला उकळी आली की त्यात 2 मोठे चमचे दाण्याचा कूट घालावा. पुन्हा पाण्याला उकळी काढून त्यात पीठ लावलेलं हरबऱ्याच्या पानाचं मिश्रण घालावं. मीठ घालावं. भाजी चांगली उकळी की एका डावात (खोलगट चमच्यात) तेल तापवून त्यात भरपूर लसूण बारीक कापून तळावा. त्यात थोडा हिंग आणि हळद घालून त्याची फोडणी आमटीला द्यावी. फोडणी दिल्यानंतर आमटी पुन्हा खळखळ उकळावी. ही आमटी भात आणि भाकरी यासोबत छान लागते.