पूर्वीच्या काळी जेवण झाल्यावर आवर्जून विडा खाल्ला जायचा. विड्याच्या पानांचा वेल दारातच असल्याने ताजे पान तोडून त्यामध्ये सुपारी, बडिशोप घालून अगदी सहज खाल्ले जायचे. आजही आपण एखाद्या समारंभाला जेवायला गेलो की त्याठिकाणी विडा आवर्जून ठेवलेला असतो. विडा खाल्ल्याने खाल्लेल्या अन्नाचे चांगले पचन होते हे आपल्याला माहित आहे. मात्र त्यापलिकडेही विडा खाण्याचे कित्येक फायदे आहेत. सध्या पान खाणे या गोष्टीकडे केवळ व्यसन म्हणून पाहिले जाते. याचे कारण म्हणजे त्यामध्ये घातले जाणारे वेगवेगळे पदार्थ. पण औषध म्हणून विड्याला बरेच महत्त्व असून यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, खनिजे, कार्बोहायड्रेट ,फायबर, व्हीटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. जे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. महिलांनी तर कॅल्शियमसाठी आणि हाडांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी विडा आवर्जून खायला हवा. पाहूयात विडा खाण्याचे फायदे...
१. पचनासाठी फायदेशीर खाल्लेले अन्न चांगल्या रितीने पचण्यासाठी विडा खाणे फायदेशीर ठरते. अनेकदा अन्नपचन योग्यपद्धतीने न झाल्याने आपल्याला अपचन, अॅसिडीटी, गॅसेस अशा पचनाशी निगडीत तक्रारी उद्भवतात. मात्र विडा खाल्ल्याने ही पचनक्रिया सुरळीत होते आणि पोट साफ राहण्यास मदत होते.
२. कॅल्शियमची खाण
विड्याच्या पानात खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. कॅल्शियम हाडांसाठी अतिशय फायदेशीर असून महिलांमध्ये साधारणपणे कॅल्शियम कमी असल्याचे आढळते. तसेच मेनोपॉजमुळे महिलांना हाडांच्या तक्रारी उद्भवतात. असे होऊ नये म्हणून महिलांनी आवर्जून नियमित विडा खायला हवा.
३. त्वचेसाठी फायदेशीर
आरोग्याबरोबरच सौंदर्यासाठीही विड्याच्या पानाचा चांगला उपयोग होतो. विड्याचे पान गरम करुन त्याची बारीक पूड करावी. त्यामध्ये मध घालून ही पेस्ट चेहऱ्याला लावावी. यामुळे त्वचेशी संबंधित तक्रारी दूर होण्यास मदत होते.
४. सर्दी व श्वसनासंबंधी समस्या दूर होण्यास मदत
सर्दी किंवा श्वसनाशी संबंधित तक्रारी असतील तर विडा उपयुक्त ठरतो. यासाठी पाण्यात पान, लवंग आणि वेलदोडा एकत्र उकळावे आणि प्यावे. त्याचा श्वसनाची क्रिया सुरळीत होण्यासाठी उपयोग होतो. नियमित विडा खाल्ला तर हळूहळू सर्दीचाही निचरा होण्यास मदत होते.
५. दात आणि हिरड्यांच्या समस्या होतात दूर
अनेकांना हिरड्यांतून रक्त येणे, दात दुखणे अशा समस्या असतात. अशांनी विड्याच्या पानात १० ग्रॅम कापूर मिक्स करुन ते खावे. हे पान चावून चावून खाल्ल्याने हिरड्यांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो. तसेच तोंडाला दुर्गंधी येत असेल तर ती दूर होण्यासही याचा चांगला उपयोग होतो.