Join us  

काॅर्नफ्लोअर घरच्याघरी तयार करण्याची घ्या एकदम सोपी पद्धत, विकत आणतो त्याहून उत्तम मका पीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 8:08 PM

विकतसारखं किंबहुना त्याहूनही चांगलं ,शुध्द काॅर्नफ्लोअर घरच्याघरी तयार करता येतं. घरी तयार केलेलं काॅर्नफ्लोअर वापरा स्वयंपाकासाठी आणि सौंदर्योपचारासाठीही.

ठळक मुद्देघरी तयार केलेलं काॅर्न फ्लोअर भरपूर दिवस टिकून राहू शकतं.केवळ स्वयंपाकासाठीच नाही तर काॅर्नफ्लोअरचा उपयोग घरच्याघरी सौंदर्योपचारातही करता येतो.

स्वयंपाकघरातील अत्यावश्यक गोष्टीत काॅर्नफ्लोअर ही एक महत्वाची बाब आहे. साठ्याच्या करंज्या करण्यापासून ते घरी मंचुरियन पदार्थ तयार करण्यासाठी काॅर्नफ्लोअरची गरज असते. केवळ स्वयंपाकासाठीच नाहीतर घरच्याघरी सौंदर्योपचारातही काॅर्नफ्लोअरची गरज असते. नेहमीचं लागणारं हे काॅर्नफ्लोअर विकतच आणायला हवं असं नाही. विकतसारखं किंबहुना त्याहूनही चांगलं ,शुध्द काॅर्नफ्लोअर घरच्याघरी तयार करता येतं

Image: Google

काॅर्नफ्लोअर तयार करण्यासाठी मका स्वच्छ निवडून घ्यावा. तो कडकडीत उन्हात एक दिवस ठेवावा. दुसऱ्या दिवशी एका मोठ्या भांड्यात 1 लिटर पाणी गरम करावं.  पाणी गरम झाल्यावर मक्याचे दाणे पाण्यात घालावेत. मक्याचे दाणे गरम पाण्यात 15-20 मिनिट उकळावेत. 20 मिनिटानंतर गॅस बंद करावा. मक्याचे दाणे पाण्यातच ठेवावेत. पाणी थंडं झाल्यावर मक्याचे दाणे हातावर चोळून घेऊन त्याची सालं काढून घ्यावीत. 

सालं काढलेले मक्याचे दाणे मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यावेत. वाटलेला मका एका भांड्यात काढावा. वाटलेल्या मक्यात 1 ते 2 कप पाणी घालाव. पाण्यात वाटलेला मका चांगला मिसळून घ्यावा. हे मिश्रण एका जाडसर कपड्यातून गाळून घ्यावं.  गाळून घेतलेलं पाणी 1-2 दिवस कडक उन्हात ठेवावं. दोन दिवसानंतर पाणी उडून जाऊन पिठीसारखं काॅर्नफ्लोअर तयार होतं.

Image: Google

घरी तयार केलेलं काॅर्न फ्लोअर भरपूर दिवस टिकून राहू शकतं. काॅर्न फ्लोअर काचेच्या बरणीत किंवा हवाबंद डब्यात भरुन ठेवावं. काॅर्न फ्लोअर वापरताना कोरडा चमचा वापरावा आणि बरणी/ डब्याचं झाकण नीट लावून ठेवावं. काॅर्न फ्लोअर प्लॅस्टिकच्या पिशवीत भरुन ती पिशवी एयर टाइट डब्यात ठेवल्यास काॅर्नफ्लोअर चांगलं टिकतं.

कोफ्ता, कबाब तयार करण्यासाठी, ग्रेव्ही आणि सूप घट्ट तयार करण्यासाठी घरी तयार केलेलं काॅर्न फ्लोअर वापरता येतं. फ्रेंच फ्राईज कुरकुरीत होण्यासाठी कोटिंग म्हणून करंज्या साटोऱ्यांसाठी लागणारा साठा तयार करण्यासाठी, बिस्किट्ं, पाय, पुडिंग, साॅसेस तयार करण्यासाठी, गुलाबजाम तयार करताना काॅर्नफ्लोअर वापरता येतं. 

Image: Google

केवळ स्वयंपाकासाठीच नाही तर काॅर्नफ्लोअरचा उपयोग घरच्याघरी सौंदर्योपचारातही करता येतो. काॅर्नफ्लोअरचा उपयोग ड्राय शाम्पू म्हणून केस स्वच्छ आणि सेट करण्यासाठी, चेहरा स्वच्छ करण्यासाठी, उन्हाळ्यात घाम येऊ नये म्हणून,  डिओडरण्ट म्हणून तसेच फेस पावडर म्हणूनही करता येतो. घरी तयार केलेल्या काॅर्नफ्लोअरचा उपयोग चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी, चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल घालवण्यासाठी, त्वचा ओलसर  राखून उजळ करण्यासाठी करता येतो. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स