दर चार तासानी काहीतरी खायला हवे असे आपण बरेचदा ऐकतो. इतकेच नाही तर दिवसभर ऑफीसचे काम, घरातले काम आणि इतर गोष्टींचे विचार यांमुळे आपल्याला ठराविक वेळाने काही ना काही खायला हवे असते. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण हे तर आपण व्यवस्थित करतोच ५ वाजताच्या दरम्यान चहाच्या वेळेला आपल्याला काही ना काही खायला हवे असते. मग अशावेळी चहासोबत बिस्कीटे, काहीचरी तळलेले पदार्थ, चिवडा, फरसाण किंवा अगदीच जास्त भूक असेल तर वडा, सामोसा असे पदार्थ खाल्ले जातात. पण अशाप्रकारे शरीरासाठी अनावश्यक असलेले पदार्थ खाल्ल्याने आपली तात्पुरती भूक भागते, पण त्याने शरीराचे म्हणावे तसे पोषण होत नाही. सध्या वर्क फ्रॉम होममुळे तर दर काही वेळाने आपल्याला काहीतरी तोंडात टाकायला लागते. अशावेळी नेमके काय खावे आणि मुलांना किंवा घरातील इतरांनाही काय खायला द्यावे असा प्रश्न तुम्हाला रोज पडत असेल, तर त्यासाठी काही सोपे उपाय आपण आज पाहणार आहोत.
१. भडंग किंवा चिवडा
चुरमुरे, साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या किंवा अगदी पातळ पोहे आपण किराणा सामानात आणू शकतो. घरात लसूण, कडीपत्ता, मिरची, दाणे या गोष्टी तर सहज उपलब्ध असतात. चुरमुरे किंवा लाह्यांना फोडणी देऊन त्यामध्ये मिरची, कडीपत्ता, लसूण, दाणे हे पदार्थ घालून ऐनवेळी सगळ्यांसाठी चिवडा परतला तर तो ५ वाजताच्या खाण्यासाठी चांगला पर्याय होऊ शकतो. यामध्ये मीठ, पिठीसाखर आणि आवडत असेल तर थोडी आमचूर पावडर घातली तरी त्याला छान आंबटसर चव येते. विकतचे पाकीटातील चिवडे खाण्यापेक्षा हा पर्याय केव्हाही चांगला. पातळ पोह्यांचा चिवडा आपण सुट्टीच्या दिवशी करुन ठेऊन तो ५ वाजता खायला घेऊ शकतो. यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असे चिरुन घेतल्यास ते आणखी पोटभरीचे होऊ शकते.
२. वेगवेगळ्या प्रकारचे दाणे
दिवसभरातून आपल्या पोटात एक मूठभर दाणे, चणे, सुकामेवा या गोष्टी जायला हव्यात असे आहारतज्ज्ञ अनेकदा सांगताना दिसतात. यामध्ये भाजलेले चणे, भाजलेले दाणे, सुकामेवा यांसारख्या गोष्टींचा समावेश करु शकतो. यामुळे पोट तर भरतेच आणि तब्येतीसाठीही या गोष्टी खाल्लेल्या चांगल्या असल्याने आपण खाऊ शकतो.
३. पौष्टीक लाडू
चहाच्या वेळी सुकामेव्याचा लाडू, पोहे आणि गव्हाच्या पीठाचा लाडू असे पौष्टीक लाडू आपण नक्कीच खाऊ शकतो. एक लाडू खाऊन कपभर दूध प्यायल्यास पोट भरलेले राहते. यामध्ये रव्याचा, नारळाचा, बेसनाचा, नाचणीचा, दाण्याचा लाडू असे बरेच पर्याय असू शकतात. त्यामुळे तुम्ही सुट्टीच्या दिवशी हे लाडू करुन ठेवल्यास तुम्हाला मधल्या वेळात खाण्यासाठी हा उत्तम पर्याय होऊ शकतो. घरच्या घरी साजूक तूप वापरुन केलेले असल्याने हे लाडू पौष्टीक असतातच आणि पोटभरीचेही होतात. हल्ली घरच्या घरी असे लाडू तयार करुन देणारे अनेक जण असल्याने वेळप्रसंगी आपण हे लाडू विकतही आणू शकतो.
४. सूप
थंडीच्या दिवसांत गरमागरम काहीतरी घ्यावेसे वाटते. अशावेळी आपण भाज्यांचे सूप करु शकतो. यामध्ये टोमॅटो सूप, पालक सूप, कॉर्न सूप, कोथिंबीर आणि लिंबाचे सूप, फ्लॉवर, कोबी, फरसबी, मटार, गाजर यांसारख्या भाज्या बारीक चिरुन त्याचे सूप करता येते. कूकरला भाज्या उकडून त्यामध्ये मीरपूड आणि मीठ घातल्यास ते अतिशय छान लागते. गरमागरम असल्याने घशाला आराम मिळतोच पण तब्येतीसाठीही असे सूप घेणे चांगले ठरु शकते.