हल्ली स्वयंपाक करताना नाॅन स्टिकची भांडी वापण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. माॅर्डन कुकिंगचा भाग म्हणूनही नाॅन स्टिकच्या भांड्यांनी स्वयंपाकघरात जागा पटकावली आहे. पदार्थ पटकन होतात, जळत- करपत नाही म्हणून नाॅन स्टिक भांडी वापरण्याला पसंती दिली जाते. नाॅनस्टिक भांड्यांना वरच्या बाजूला एक खास कोटींग असल्याने या भांड्यांमध्ये पदार्थ जळत नाही. पण पदार्थ न जळणं, न करपणं म्हणजे सुरक्षित स्वयंपाक नव्हे. नाॅनस्टिक भांड्यात केला जाणारा स्वयंपाक आरोग्यासाठी सुरक्षित असण्यासाठी नाॅनस्टिक भांड्यात कोणते पदार्थ करावेत, कोणते करु नयेत याबाबतचे नियम समजून घेऊन स्वयंपाक केल्यास नाॅनस्टिक भांड्यातला स्वयंपाक आरोग्यासाठी सुरक्षित ठरतो.
Image: Google
काय करावं- काय टाळावं?
1. ज्या भाज्या स्टिर फ्राय करणं गरजेच्या असतात त्यासाठी नाॅनस्टिक पॅन वापरु नयेत. कारण भाज्या स्टिर फ्राय करण्यासाठी गॅसची आच मोठी लागते. मोठ्या आचेवर भाज्या परतण्याला स्टिर फ्राय म्हणतात. नाॅनस्टिक भांडी वापरताना गॅसची आच मंद ठेवावी लागते. नाॅनस्टिक भांडी वापरताना गॅस मोठा ठेवल्यास या भांड्याच्या कोटिंगवर परिणाम होऊन कोटिंगमधील विषारी घटक अन्नपदार्थात मिसळण्याचा धोका वाढतो.
2. जे पदार्थ करायला / शिजायला जास्त वेळ लागतो ते पदार्थ नाॅनस्टिक भांड्यात करु नये. कारण नाॅनस्टिक भांडी जास्त वेळ गॅसवर ठेवल्यास भांड्यांवरचं कोटिंग विरघळतं. 500 डिग्री सेल्सिअस तापमानाला नाॅनस्टिक भांड्यांची कोटिंग विरघळायला सुरुवात होते. त्यामुळे जे पदार्थ जास्त वेळ शिजवणं गरजेचे असतात ते पदार्थ नाॅनस्टिक भांड्यात करु नये.
Image: Google
3. साॅस, सूप, खीर हे पदार्थ मंदं आचेवर केले जातात. यांना स्लो कुकींग असं म्हणतात. हे पदार्थ करताना नाॅनस्टिक भांडीं वापरु नये. कारण नाॅनस्टिक भांडी दीर्घकाळ गॅसवर तापत ठेवल्यास कोटींग खराब होवून ते अन्नपदार्थात मिसळते.
4. डोसे, धिरडे, नूडल्स् यासारखे झटपट पदार्थ करण्यासाठी नाॅनस्टिक तवा आणि पॅनचा वापर करावा. कमी वेळ लागणाऱ्या, पटकन शिजणाऱ्या, उकडलेल्या भाज्या केवळ परतण्यासाठी नाॅनस्टिक भांड्यांचा वापर योग्य ठरतो.
Image: Google
5. नाॅनस्टिकच्या भांड्यात तयार केलेला पदार्थ त्यातच दीर्घकाळ ठेवू नये. ते नाॅनस्टिक पॅनमधून दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावेत.
6. नाॅनस्टिक भांडी एकदम गरम असताना त्यात पाणी घालू नये. ही भांडी पूर्ण थंडं झाल्यावर त्यात पाणी घालावं.
7. नाॅनस्टिक तवा, पॅन वापरताना चमचे, उलथणे हे धातूचे वापरु नयेत. धातूच्या चमच्यांनी तवा, पॅनला ओरखडे पडतात.
Image: Google
8. नाॅनस्टिक भांड्यांच्या कोटिंगचा रंग फिका पडला असल्यास, भांड्यावर ओरखडे पडलेले , पॅन, तव्याचा आकार वाकडा तिकडा झालेला असल्यास अशी भांडी स्वयंपाकासाठी असुरक्षित असतात.
9. नाॅनस्टिक भांडी एकदा आणली म्हणजे आयुष्यभराचं काम झालं असं नाही. दर पाच वर्षांनी नाॅनस्टिक भांडी बदलणं आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ठरतं.
10. नाॅनस्टिक भांडी धुताना खडबडीत घासण्यांचा वापर केल्यास कोटींग खराब होतं. ही भांडी स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आणि मऊ घासण्यांचा वापर करावा.