आपल्या आरोग्यात आहाराचा वाटा मोठा आहे. दिवसभरात आपण जो आहार घेतो त्यात सकाळच्या नाश्त्याचं महत्त्व निर्विवाद आहे. नाश्त्याचा विचार करताना केवळ चवीचा, आवडी निवडीचा विचार करुन भागत नाही तर आरोग्याचा विचारही महत्त्वाचा असतो. सकाळी पोटभर नाश्ता करणं आवश्यक आहे. पण म्हणून नाश्त्याला पुरी भाजी, पराठे , कटलेट, मेदू वडे यासारखे जड पर्याय निवडले तर असा नाश्ता आरोग्यास धोकादायक आहे. आठवड्यातले सातही दिवस नाश्त्याला पचण्यास जड पदार्थ करण्यापेक्षा आठवडयातले तीन चार दिवस हलके फुलके पदार्थही नाश्त्याला करावेत. हलके आणि आरोग्यदायी पदार्थ काय करावेत याबाबत पटकन काही सूचेलच असं नाही. त्यासाठीच अशा हलक्या फुलक्या पदार्थांचे पर्याय डोक्यात तयार हवेत. असे सहा पदार्थ आहेत जे चवीला उत्तम असतात शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. नाश्त्याला करुन करुन काय करणार या प्रश्नाला हे सहा पदार्थ चांगला पर्याय ठरु शकतील.
1 ब्राऊन ब्रेड सॅण्डविच
नाश्त्याला मैद्याच्या ब्रेडचे पदार्थ करुन खायला सगळ्यांनाच आवडतं. पण मैद्याचे ब्रेड हे लहानांपासून मोठ्यांपर्यत कोणासाठीही चांगले नसतात. त्यामुळे ब्रेडची हौस भागवायची असेल आणि पौष्टिकतेची गरजही भागवायची असेल तर ब्राऊन ब्रेड सॅण्डविच करावं. बटाट्याचं सारण भरुन ते ओव्हन वर किंवा सॅण्डविच मेकरमधे भाजून करता येतं. किंवा हिरवी पुदिना- कोथिंबीर चटणी आणि हिरव्या भाज्यांचा वापर करुनही करता येतं. कोणत्याही प्रकारचं ब्राऊन ब्रेड सॅण्डविच छान लागत.
2 स्प्राउट चाटमोड आलेल्या कडधान्यांच्या चटपटीत चाटमधे भरपूर पोषण मूल्यं असतात. शिवाय शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवायलाही स्प्राउट चाट मदत करतात. कोणत्याही प्रकारचं मोड आलेलं कडधान्यं कुकरमधून एक शिट्टी करुन घ्यावं. त्यात कांदा टमाटा, हिरवी मिरची, चाट मसाला आणि थोडं मीठ टाकून खावं. या चाटमधे मिरे पावडर आणि लिंबाचा रस टाकला तर चवही वाढते आणि त्याचं पोषणमूल्यही वाढतं.
3 फळांचा रायता
सकाळच्या नाश्त्यात घरी विरजलेलं ताजं दही खाऊ शकता. दही आणि फळं हा संयोग भूकही भागवतो शिवाय पौष्टिकही असतो. या रायत्यानं दिवसभरासाठी भरपूर ऊर्जा मिळते. यात फॅटचं प्रमाण कमी असतं आणि अँण्टि ऑक्सिडण्टस भरपूर असतात. दही आणि फळं एकत्र करुन खाल्ल्यानं हदयाचं आरोग्य चांगलं रहातं. यासाठी दही, थोडी साखर, संत्री, सफरचंद, डाळिंबही फळं घ्यावीत.
4 ओटसचा उपमा किंवा इडली
आरोग्याच्या दृष्टीनं ओटस खाण्याला आता खूप महत्त्व आलं आहे. नाश्त्यासाठी ओटसचे विविध पकार करुन खाता येतात. ओटसमधे तंतूमय घटकाचं प्रमाण जास्त असल्यानं ओटसच्या पदार्थांचा नाश्ता केल्यास पचनक्रिया सुधारते. ओटस आणि फळं असंही कॉम्बिनेशन उत्तम मानलं जातं. ओटसमधे विविध भाज्या आणि मीठ, मसाले टाकून मसाला ओटस करु शकता. यालाच ओटसचा उपमा असंही म्हणतात. तसेच ओटसची इन्स्टंट इडलीही होते. ओटस, थोडा रवा, दही आणि भाज्या बारीक करुन ते इडलीच्या मिश्रणाप्रमाणे पातळ करुन त्याच्या इडल्या छान लागतात.
5 मिश्र धान्यांची इडली
मिश्र धान्यांच्या इडलीमुळे अनेक धान्यांचे सत्त्वं एका पदार्थातून पोटात जातात. ही मिर्श धान्यांची इडली बनवण्यास सोपी असते. ज्वारी, बाजरी, नागली, गहू यांचं पीठ समान घ्यायचं. उडदाची डाळ दोन तास भिजवून ती वाटून यात सर्व धान्यांची पिठं एकत्र करुन ते पीठ आंबवून त्याच्या इडल्या करता येतात. याचं पोषणमूल्यं आणि चव वाढवण्यासाठी त्यात विविध भाज्या बारीक चिरुन टाकता येतात.
6 मिक्स फ्रूट ओटस स्मूदी
नाश्त्याला कधी मिक्स फ्रूट ओटस स्मूदी करणं आरोग्यासाठी उत्तम आहे. स्मूदीमुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहातं. ही स्मूदी चविष्ट आणि पौष्टिकही असते. ही स्मूदी तयार करण्यासाठे केळं, दूध, डाळिंब, दही आणि ओटस हे सर्व एकत्र ब्लेंडरमधून फिरवून घ्यावं. ही स्मूदी अगदी झटपट होते.