-श्वेता खोलकुटे
कोरोना संसर्गाची धास्ती आहेच आणि त्यात पावसाळा म्हणजे साथीच्या रोगांचा हंगाम. साथीचे आजार पसरायला लागले की काळजी वाटते. खरंतर धास्तीच वाटते, की आता कसं होणार? त्यात घरातली लहान मुलं आणि वडीलधारी माणसं, त्यांच्या तब्येती लगेच कुरकुरायला लागतात. अशावेळी वाटतं की, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही करता येईल का? अनेकजणी तर टीव्हीवरच्या जाहिराती पाहून काहीबाही विकत आणतात. ‘इम्युनिटी वाढते’ अशा प्रचाराला हमखास बळी पडतात.
पण अशी एका रात्रीत प्रतिकार शक्ती कशी वाढेल? त्यासाठी आपल्या आहारात काही सातत्यपूर्ण बदल करावे लागतील. काही छोट्या गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती त्यातल्या त्यात चांगली ठेवू शकतो.
आपल्या घरातल्या स्वयंपाकशाळेत असं बरंच काही आहे, जे नियमित केलं तर आपण आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी बरीच मदत होऊ शकेल!
- तुळस- रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो.
- तूप- कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धाचमचा तूप आवर्जून खावं. तूप म्हणजे चांगल, शुध्द तूप. घरी लोणी कढवून काढलेलं तूप . बाहेर शुध्द तूप म्हणून मिळणारं तूप बरेच जण चांगलं तूप म्हणून खातात. पण असं तूप खावून फरक पडत नाही. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. अनेकजण कौतुकानं आपल्या आहारात चीज, बटर असल्याचं सांगतात. पण जी कमाल अर्धा चमच तूप करतं ती या पदार्थांना जमत नाही.
- नाचणी सत्वं- दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचं सत्त्व हवंच. नाचणीच्या सत्त्वामध्ये सर्व मुख्य जीवनसत्त्वं असतात. हे नाचणी सत्त्वं दिवसातून एकदा तरी शरीरात जाणं आवश्यक असतं.
- आवळा-लिंबू- लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असतं. एक अख्खं लिंबू आपण खावू शकत नाही. पण लिंबाची एक फोड मात्र सहज खावू शकतो. पण लिंबू खावं म्हणजे लिंबूचं खावं. लिंबाचं लोणचं नव्हे. आवळा हा प्रामुख्यानं हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरआवळा, कॅंण्डी या स्वरूपात वर्षभर आवळा उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते.
- चिंच-आमसूल आणि लाल मिरची- आहारशास्त्राप्रमाणे आपल्या जेवणात चिंच-आमसूल हवंच. दोन्ही वेळच्या जेवणात नसलं तरी एका जेवणातल्या आमटीत किवा भाजीत कशाततरी चिंच /आमसूल घालायलाच हवा. पण भाजी आमटीत टाकलेला आमसूल जेवतांना हमखास ताटाबाहेर काढून ठेवला जातो. पण हा आमसूल पोटात जाणंही आवश्यक आहे. लाल वाळलेल्या मिरचीचा तुकडा पोटात जाणं आवश्यक आहे. वाळवलेल्या मिरचीमध्ये जीवनसत्त्वं आणि अँण्टिऑक्सिडंटस असतात. मिरची खायची म्हणजे मिरचीचा ठेचा खावा किंवा भाज्या-आमटया तिखटजाळ असाव्यात असं नाही. अशा पध्दतीनं मिरची खाल्ली तर शरीराला अपाय होण्याचीच जास्त शक्यता. शरीराला फायदा होण्यासाठी आहारात मिरचीचा छोटा तुकडाच असावा.
- दूध-हळद- रात्री जेवल्यानंतर एक कपभर दुध उकळून त्यात एक चमचा हळद घालावी. आणि ते दूध रोज प्यावं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा हा उत्तम उपाय. दूध-हळद पिणं ही एकदम आरोग्यदायी सवय आहे. पण या हळद घातलेल्या दुधात चव म्हणून अनेकजण साखर घालतात. पण तसं करू नये.
- बीट- दुपारच्या जेवणात कोशिंबीर असावी. पण ती काकडी, टोमॅटो नाहीतर मुळयाचीच हवी असं नाही. उलट रोजच्या जेवणात बीटाची कोशिंबीर खाल्ल्यास एकाचवेळेस शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं, अँंन्टिऑक्सिडंटस मिळतात. बीट हे उत्तम शक्तीवर्धक आहे त्यामुळे आहारात तर बीटाचा समावेश असायलाच हवा.
- पाणी- आरोग्याच्यादृष्टीनं पाण्याचं महत्त्वं वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या शरीरात 70 टक्क्यांपेक्षाही जास्त पाणी असतं. पाण्याची तहान लागली तर ती पाण्यानंच भागेल याची काळजी घेतल्यास शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाईल. तहान लागली पाणी नाही म्हणून मिल्क शेक/ नारळपाणी/ज्यूस प्यायलं म्हणून तहान भागत नाही. उलट शरीराची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही तर पाण्याला पर्याय म्हणून पोटात टाकलेले पदार्थ शरीर उलटवून टाकण्याचीच शक्यता जास्त. पाणी आवश्यकतेपेक्षा कमी प्यायलं किंवा जास्त प्यायलं तरी अपाय होतो. योग्य पाणी पिण्याबरोबर पाण्याबाबतचा एक नियम लहानांपासून वृध्दांपर्यंत सर्वांनीच पाळावा. रोज झोपायला जाण्याआधी प्रत्येकानं जास्तीत जास्त 200मिलीलीटर आणि कमीत कमी 100 मिलीलीटर पाणी प्यायलाच हवं.
नियम नव्हे, गुरूकिल्लीच!
शरीराला उत्तम आणि योग्य आहाराची सवय लावल्यास शरीराची प्रतिकारशक्ती हमखास वाढते. पण आहाराला विहाराचीही उत्तम जोड असायला हवी. काय खावं? काय खावू नये ? याला जेवढं महत्त्वं आहे तितकंच महत्त्व वेळेला आणि खाण्या-पिण्याच्या, उठण्या-झोपण्याच्या सवयींनाही आहे आणि म्हणूनच ती पथ्यंही पाळायला हवीत.
1 लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सुर्योदयाला उठायलाच हवं. सुर्योदयानंतरच्या दोन तासात व्यायाम आणि सकाळचा नास्ता घ्यावा. दुपारी बारा ते एक च्या दरम्यान जेवण घ्यावं. दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान दुध किंवा फळं घ्यावीत. रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान रात्रीचं जेवण घ्यावं. आणि रात्री दहापर्यंत झोपणं आवश्यक आहे. हे केवळ झोपण्या-उठण्याचं, खाण्या-पिण्याचं वेळापत्रक नसून निरोगी आरोग्याची गुरूकिल्ली आहे.
2 टी.व्ही पाहतांना कोणीही जेवण करू नये. टी.व्हीमुळे जेवणाकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे जेवण कमी किंवा जास्त होतं. आणि यामुळे आरोग्याची लयही बिघडते.
( लेखिका आहारतज्ज्ञ आहेत)