Join us  

महिलांनी रोज न चुकता खायलाच हव्यात या २ गोष्टी, फिटनेससाठी अत्यंत आवश्यक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2022 12:55 PM

सगळ्या पातळ्यांवर लढताना आपली तब्येत चांगली ठेवायची असेल तर आहार-विहार योग्य असायलाच हवा.

ठळक मुद्देडाळीचे लाडू, वडे किंवा भजी, धिरडी अशा वेगवेगळ्या  स्वरुपात आपण डाळींचा उपयोग करु शकतो.आपली तब्येत ठणठणीत ठेवायची असेल तर आहार चांगला असायलाच हवा

महिलांची रोजची धावपळ काय असते हे जिचे तिलाच माहिती. विरजण लावण्यापासून ते दुसऱ्या दिवशी नाश्त्याला काय करायचे आणि घरात अमुक सामान आहे का अशा असंख्य गोष्टी एकावेळी त्यांच्या डोक्यात सुरू असतात. घर टापटीप दिसण्यापासून ते मुलं नीटनेटकी दिसावीत यासाठीही महिला सकाळी उठल्यापासून झटत असतात. घरातील प्रत्येकाची आवडनिवड, आजारपणे, सणवार अशा विविध पातळ्यांवर लढत असताना त्यांची तब्येत चांगली असणे आवश्यक असते. त्यातही महिला वर्कींग असेल तर काही विचारायलाच नको. मात्र सगळ्या पातळ्यांवर लढताना आपली तब्येत चांगली ठेवायची असेल तर आहार-विहार योग्य असायलाच हवा. 

(Image : Google)

अनेकदा आपण रात्रीचे राहिलेले शिळे खातो. आधी घरातील सगळ्यांना जेवायला वाढतो आणि उरेल तितक्यात आपण भागवतो तर कधी इतरांच्या आवडी आणि तब्येती जपताना आपले स्वत:कडे दुर्लक्ष होते. पण या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो आणि मग कालांतराने आरोग्याच्या काही ना काही तक्रारी उद्भवतात. पण रोजच्या रोज आहारात काही गोष्टींचा समावेश ठेवला तर आपले आरोग्य़ उत्तम राहायला मदत होते. आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप ही उत्तम आरोग्याची त्रिसूत्री असून आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केल्यास आपण जास्त तंदुरुस्त राहतो पाहूया...

१. नटस किंवा सुकामेवा 

आपल्याला नाश्ता झाला किंवा पोटभर जेवण झाले तरी मधे सतत काही ना काही खावेसे वाटते. यावेळी आपल्याला भूक असतेच असे नाही पण काहीतरी कुरमुरीत किंवा चमचमीत हवं असतं. मग आपण काही ना काही जंक फूड खातो. पण असे करण्यापेक्षा या मधल्या वेळात आपण आरोग्याला फायदेशीर असणारे असे काही खाल्ले तर? अशावेळी वेगवेगळ्या प्रकारचे नटस खाल्ल्यास त्याचा आपल्या शरीराला अतिशय चांगला फायदा होतो. यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडस असतात त्यामुळे आरोग्यासाठी ते फायद्याचे असते. तसेच नटस खाल्ल्याने पोट भरलेले राहते त्यामुळे सतत भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. सुकामेव्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे कोलेस्टेरॉल कमी होते, तसेच प्रोटीन आणि चांगल्या फॅटसचे प्रमाण यामध्ये चांगले असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी सुकामेवा खाणे फायदेशीर ठरते. म्हणून आहारात नियमितपणे सुकामेवा खायला हवा. 

(Image : Google)

२. डाळी 

डाळींशिवाय आपला आहार पूर्ण होत नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण आपल्या दिवसभराच्या एका जेवणात तरी आमटी किंवा क़डधान्याची उसळ असतेच. डाळींमध्ये व्हिटॅमिन बी, आयर्न, कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम हे सगळे घटक योग्य प्रमाणात असतात. डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असल्याने तुम्ही शाकाहारी असाल तरी तुमच्या शरीरात प्रथिनांचे प्रमाण चांगले राहू शकते. डाळींमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास याचा चांगला फायदा होतो. डाळ म्हणजे केवळ वरण किंवा आमटी नाही. तर डाळीचे लाडू, वडे किंवा भजी, धिरडी अशा वेगवेगळ्या  स्वरुपात आपण डाळींचा उपयोग करु शकतो. त्यामुळे तुम्हाला एकावेळी बऱ्याच गोष्टी सक्षमपणे सांभाळायच्या असतील आणि आपली तब्येतही ठणठणीत ठेवायची असेल तर या दोन गोष्टींचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. 

टॅग्स :अन्नआरोग्यआहार योजनाफिटनेस टिप्स