Join us  

पावभाजीची ' भाजी ' उरली आहे? करा एक झटपट भन्नाट पदार्थ, बच्चे कंपनी खुश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2023 11:44 AM

PAV BHAJI FONDUE RECIPE : उरलेल्या भाजी पासून घरीच बनवा 'फाँड्यू' पाव भाजी.

पाव भाजी ही मुंबई आणि भारतातील सगळ्यांत फेमस डिश आहे. मुंबईतील रस्त्यांवरील गाडीवर मोठा तवा ठेवून त्यावर लाल चुटुक रंगांची, मखमली बटरमध्ये घोळवून घेतलेली ही भाजी यासोबतच गरम तव्यावर बटर मध्ये घोळवलेले पाव. या पाव भाजीच्या सुगंधाने पोट भरलेले असेल तरी परत भूक लागते  आणि पावभाजी खाण्याचा मोह आवरता येत नाही. कधी जेवणाला, भूक लागली म्हणून, पार्टीसाठी, अचानक पाहुणे आले असता तुम्ही नक्कीच पाव भाजीचा बेत करू शकता. आजकाल आपल्याला बाजारात पाव भाजीचे विविध प्रकार खायला मिळतात. आपण घरीसुद्धा कधी - कधी पाव भाजी बनवतो. पाव भाजी बनवल्यावर ती सहसा उरत नाहीच परंतु कधी शिल्लक राहिली तर त्याचे काय करायचे? असा प्रश्न पडतो. आता उरलेल्या भाजी पासून घरीच बनवा फाँड्यू पाव भाजी. फाँड्यू पाव भाजीची साहित्य व कृती समजून घेऊयात(PAV BHAJI FONDUE RECIPE). 

thepink.apron या इंस्टाग्राम पेजवरून फाँड्यू पाव भाजीची साहित्य व कृती शेअर करण्यात आली आहे.   

फाँड्यू हा नेमका काय प्रकार आहे ? एखाद्या द्रव्य पदार्थामध्ये ब्रेड, भाज्या किंवा फळं बुडवून खाण्याच्या प्रकाराला 'फाँड्यू' असं म्हणतात.‘चीज फाँड्यू’ हा मूळ प्रकार असून, आता त्यात विविध चवींची भर घालण्यात आली आहे.

साहित्य -

१. पाव भाजी मधील फक्त भाजी - १.५ कप (जास्तीची भाजी उरलेली असेल तरी चालेल) २. बटर - २ टेबलस्पून३. लसूण पेस्ट  - २ टेबलस्पून४. कोथिंबीर - २ टेबलस्पून ५. मक्याचे पीठ - १/४ कप ६. दूध - १/२ कप ७. मॉझरेला चीज - १/४ कप ८. प्रोसेस्ड चीज - १/४ कप ९. मीठ - चवीनुसार१०. लाल मिरची पेस्ट - १ टेबलस्पून (जास्त तिखट हवी असल्यास) 

कृती - 

१. एका कढईमध्ये बटर घालून ते व्यवस्थित वितळवून घ्या. त्यानंतर त्यात लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घाला. २. या मिश्रणात मक्याचे पीठ मिसळा. मक्याचे पीठ घातल्यावर हे मिश्रण थोडे घट्ट होण्यास सुरुवात होईल.  ३. या मिश्रणात दूध घालून त्याची कन्सिस्टंसी तुमच्या आवडीनुसार करून घ्या. ४. त्यानंतर यात मॉझरेला चीज व प्रोसेस्ड चीज घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या.५. आता चीजपासून तयार झालेल्या या व्हाईट सॉसमध्ये तयार भाजी घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या.

सर्व्ह करताना - १. हे सर्व्ह करताना आपण छोट्या फाँड्यू कपमध्ये सर्व्ह करू शकतो. २. फाँड्यू पाव भाजी सर्व्ह करताना त्याच्यासोबत तोंडी लावायला पापड किंवा बारीक चिरलेला कांदा देऊ शकता. ३. साधा ब्रेड, पाव किंवा सारडोह ब्रेड (Sourdough Bread) सोबत फाँड्यू पाव भाजी सर्व्ह करू शकता. 

टीप - सारडोह ब्रेड (Sourdough Bread) हा फक्त पीठ, पाणी, मीठ असे घटक वापरून नैसर्गिक पद्धतीने केला जातो. यात कोणत्याही प्रकारचे आर्टिफिशियल घटक वापरत नाही.

टॅग्स :अन्न