दिवाळी या पाच दिवसांच्या सणानिमित्त अनेक प्रकारचे विशिष्ट पदार्थ बनवले जातात. त्यात गोड पदार्थांचा देखील समावेश असतो. लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खीर हा गोड पदार्थ प्रचंड आवडतो. मग ती तांदळाची असो, गव्हाची या बदामाची. खीर हा पदार्थ घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खातात. आज आपण शेवयांची खीरीची पारंपरिक पद्धत जाणून घेणार आहोत. दिवाळीतील भाऊबीज आणि पाडवा या एकाच दिवशी येणाऱ्या खास दिनानिमित्त शेवयांची खीर कशी बनवायची याची सोपी आणि पारंपारिक पद्धत जाणून घेणार आहोत. चला तर मग, या सणानिमित्त आपल्या जोडीदाराचे आणि भावाचे या शेवयांच्या खीरीने तोंड गोड करुयात.
शेवयांची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य :-
200 mililitre दूध
50 ग्रॅम राइस व्हर्मीसेली
मिल्क पावडर
साखर
आवश्यकतेनुसार वेलचीची पावडर
आवश्यकतेनुसार बदाम
आवश्यकतेनुसार काजू
आवश्यकतेनुसार काळे मनुके
तूप
कृती :-
सर्वप्रथम पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घालून त्यात काप केलेले काजू व बदाम चांगले भाजून घ्या. त्यानंतर त्याच तूपात काळे मनुकेही व्यवस्थित फ्राय करा. सर्व सामग्री भाजल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेऊन द्या.
आता त्याच पॅनमध्ये शेवया घालून एक ते दीड मिनिटे मंद आचेवर चांगल्या भाजून घ्या. शेवया करपू नयेत म्हणून सतत ढवळत राहा. खरपूस भाजल्यानंतर आता भाजलेल्या शेवया थंड होण्यासाठी पॅनमधून काढून बाजूला ठेवा.
पॅनमध्ये २०० मिलिलीटर दूध उकळून घ्या. दूध उकळू लागताच त्यामध्ये भाजलेल्या शेवया घाला आणि चांगल्या शिजवून घ्या. जवळ जवळ ४ ते ५ मिनिटे शेवया शिजू द्या. दूध उकळून थोडं घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर घाला व मिश्रण चांगलं मिक्स करा. पुढे, २ चमचे मिल्क पावडर, भाजलेले ड्राय फ्रुट्स आणि चिमुटभर वेलची पावडर घालून मिश्रण मंद आचेवर शिजवा.
तयार आहे आपली शेवयांची स्वादिष्ट खीर! ही गरमा गरम खीर बाउलमध्ये सर्व्ह करा आणि ड्राय फ्रुट्स घालून खीर गार्निश करा. ही खीर तुम्ही गरम किंवा थंड करुन देखील खाऊ शकता. किमान २ दिवस तरी ही खीर तुम्ही फ्रिजमध्ये स्टोर करुन ठेऊ शकता.