दिवाळीनिमित्ताने महिलावर्ग फराळ आणि गोड पदार्थ बनवण्यात व्यग्र असतात. अनेक पाहुणे, मित्र मंडळी आणि नातेवाईक घरी पाहुणचार करण्यासाठी येत असतात. या दिवाळीच्या ५ दिवसात मिठाईच्या दुकानातून मिठाई आणण्यापेक्षा घरीच झटपट आणि चविष्ट बनणारा शाही तुकडा आपण बनवू शकता. बहुतांशवेळा मिठाईतील दुकानातील गोड पदार्थांमध्ये भेसळयुक्त रसायने मिसळले असतात. त्यामुळे ते पदार्थ पाहुणे मंडळींना खाऊ घालण्यापेक्षा हा उत्तम प्रकार घरच्या साहित्यात बनणारा शाही तुकडा टेस्टी डिजर्ट म्हणून आपण देऊ शकता. चला तर मग या रेसिपीला काय साहित्य लागतं जाणून घेऊयात.
साहित्य :-
ब्रेड – ४ स्लाइस
दूध – एक लिटर
कन्डेन्स मिल्क – १०० ग्रॅम
साखर – १०० ग्रॅम
केसर
काजू
बदाम
तूप
कृती
सर्वप्रथम ब्रेडचे काठ कापून घ्यावे. त्यानंतर ब्रेडचे त्रिकोण काप करावे. आपण एका ब्रेडचे 2 किंवा 4 तुकडे करू शकता. आता कढईत तूप गरम करून ब्रेड मंद आचेवर तळून घ्या. सर्व ब्रेड तळून घेतल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यावे.
त्यानंतर साखरेचा पाक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये साखर आणि पाणी मिसळा, गुलाब जामूनला ज्याप्रकारे पाक बनवतात त्याचप्रमाणे पाक बनवायचे आहे. पाक तयार झाल्यानंतर त्यात वेलची पूड घालायची आहे. जेणेकरून पाकेला सुंदर सुगंध येईल.
पाक तयार झाल्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये दूध, कन्डेन्स मिल्क आणि केशर टाकून उकळून घ्यावे. दुधाला घट्टपणा आल्यानंतर त्यात चिरलेले बदाम आणि काजू घाला. दूधाला रबडीसारखा घट्टपणा आला की गॅस बंद करावे.
आता शेवटी एका प्लेटमध्ये पाकात बुडवलेले ब्रेड ठेवायचे आहे. त्यावर रबडी पसरवायची आहे. आणि त्यावर सजावटीसाठी काजू आणि बदामाचे काप ठेवायचे आहे. अश्याप्रकरे झटपट आणि चविष्ट शाही तुकडा विथ रबडी झाली रेडी.