आवळा (Amla) आपल्या बहुगुणी गुणधर्मासाठी ओळखला जातो. आवळा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तज्ज्ञ हिवाळ्यात आवळा खाण्याचा सल्ला देतात. शतकांपासून आवळ्याचा उपयोग रोग बरे करण्यासाठी होतो. व्हिटॅमिन-सीने समृद्ध आवळ्याचे अनेक पदार्थ केले जातात. आवळ्याचं लोणचं, मुरब्बा, कँडी, ज्यूस आणि च्यवनप्राशच्या रूपात सेवन केले जाते. पण आपण कधी आवळ्याची चटणी (Amla Chutney) ट्राय करून पाहिली आहे का?
ज्यांना आवळा खायला आवडत नाही, त्यांच्यासाठी आपण खास आवळ्याची चटणी तयार करू शकता. आवळ्याची चटकदार चटणी तोंडी लावण्यासाठी खाल्ली जाऊ शकते. या चटणीमुळे जिभेची चव तर वाढतेच, शिवाय करायलाही सोपी आहे (Cooking Tips). चला तर मग आवळ्याची चटकदार चटणी कशी तयार करायची पाहूयात(This Tangy And Healthy Amla Chutney Is Ready At Home With Just A Few Ingredients).
आवळ्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य
आवळा
किसलेलं खोबरं
लसणाच्या पाकळ्या
हिरव्या मिरच्या
भाजलेली चणा डाळ
जिरं
मीठ
कोथिंबीर
तेल
मोहरी
हिंग
कडीपत्ता
कृती
सर्वप्रथम, आवळ्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात आवळ्याचे तुकडे, एक कप किसलेलं खोबरं, ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या, २ ते ३ हिरव्या मिरच्या, २ चमचे भाजलेली चणा डाळ, एक चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना पाणी घालू नका.
तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, मोहरी, कडीपत्ता आणि चिमुटभर हिंग घालून खमंग फोडणी तयार पेस्टवर ओतून मिक्स करा. अशा प्रकारे आवळ्याची चटकदार चटणी खाण्यासाठी रेडी. आपण ही चटणी पराठा, चपाती, भाकरीसोबत खाऊ शकता.