थंडीच्या दिवसांत आपण आवर्जून तीळ, गूळ, साखर या ऊर्जा देणाऱ्या गोष्टी जास्त प्रमाणात खातो. त्यामुळे संक्रांतीच्या सणाला आपण आवर्जून तीळगुळाच्या वड्या, लाडू, तीळपापडी असं काही ना काही घरी करतोच. पण जत्रेत किंवा एखाद्या मंदिरापाशी आवर्जून मिळणारा आणखी एक पारंपरिक आणि हेल्दी पदार्थ म्हणजे तीळाची रेवडी. साखर किंवा गूळ आणि तीळ या पदार्थांपासून बनवली जाणारी ही रेवडी खायली जितकी छान लागते तितकीच ती चविलाही मस्त असते. लहान मुलांना जाता येता तोंडात टाकायला किंवा जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा झाल्यावर खाता येईल असा हा उत्तम पर्याय आहे. आता ही रेवडी घरच्या घरी कशी तयार करायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आपण या रेवडीची सोपी रेसिपी पाहणार आहोत (Til Gul Revdi Recipe ).
साहित्य -
१. पांढरे तीळ - २ वाटी
२. गूळ - २ वाटी
३. तूप - ३ चमचे
४. केवडा किंवा रोज इसेन्स - २ थेंब
५. बेकिंग सोडा - चिमूटभर
कृती -
१. पांढरे तीळ स्वच्छ करून कढईत घालून मंद आचेवर हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या.
२. हे तीळ एका ताटात काढून घेऊन त्याच कढईत तूप घाला. तूप वितळल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेला गूळ घाला आणि ढवळून त्याचा पाक बनवा.
३. गूळ पूर्णपणे वितळून घट्ट होईपर्यंत चांगला शिजवायचा.
४. आता गुळाच्या पाकात चिमूटभर बेकिंग सोडा टाका घालून हे मिश्रण चांगले हलवत राहायचे.
५. यामध्ये तीळ आणि केवडा इसेन्स घालून मिश्रण पुन्हा एकजीव करायचे.
६. हे मिश्रण आता एका ताटात काढून थोडे गार होऊद्या.
७. हाताला तूप लावून हे मिश्रण हातावर घेऊन त्याच्या चपट्या गोळ्या करा आणि त्या पुन्हा तीळात घोळून घ्या.
८. मिश्रण गरम असतानाच रेवड्या बनवाव्यात, नाहीतर नंतर बनवायला खूप अवघड जाते. रेवडी बनवून झाल्यावर गार होण्यासाठी ठेवावी म्हणजे ती खुटखुटीत होते.