Join us  

थंडीत पानात असायलाच हवी तिळाची पारंपरिक-चविष्ट चटणी, तोंडी लावण्यासाठी १० मिनीटांत होणारी सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2023 12:35 PM

Til sesame seeds Chutney Recipe : तीळ उष्ण असल्याने थंडीच्या काळात तीळाचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा.

थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. अशावेळी नेहमीच्या आहारात थोडे बदल केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. तसेच थंडीत आपल्याला गरमागरम, चमचमीत काहीतरी खावेसे वाटते. अशावेळी जेवणाची लज्जत वाढवायची असेल तर ताटातली डावी आणि उजवी बाजू व्यवस्थित असायला हवी. रोज तिच ती पोळी, भाजी आणि भात, आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर पानात एखादी चटणी किंवा वेगळ्या चवीचे लोणचे असेल तर ४ घास आवडीने आणि जास्त खाल्ले जातात. थंडीच्या दिवसांत पौष्टीक आणि संतुलित आहार असावा यासाठी तीळ, दाणे, गूळ, सुकामेवा, भाज्या यांचा आहारात जास्त प्रमाणात समावेश करण्यास सांगितले जाते. आई किंवा आजीच््या हातच्या चटणीची चव आपल्यापैकी अनेकांच्या जीभेवर आजही असते. तशीच चटणी आपल्याला करायची असेल तर नेमके काय करायचे ते समजून घ्यायला हवे (Til sesame seeds Chutney Recipe). 

तोंडी लावणे हा महाराष्ट्रीयन जेवणातील एक महत्त्वाचा भाग. तीळ उष्ण असल्याने थंडीच्या काळात तीळाचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. भुकेच्या वेळी पटकन काही करण्यापेक्षा या चटणी पोळीचा रोलही खाता येतो.इतकेच काय पण एखादवेळी भाजी आवडीची नसेल आणि मुलं पोळी खायला खूपच त्रास देत असतील तर अशावेळी ही तिळाची चटणी उत्तम पर्याय होऊ शकतो. तीळात असणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक हाडांसाठी अतिशय फायदेशीर असतात.तीळात फायबर आणि अँटीऑक्सिडंटस जास्त प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही त्याचा चांगला उपयोग होतो.तीळांमध्ये असणारी स्निग्धता त्वचा आणि केसांचा कोरडेपणा कमी करण्यास उपयुक्त ठरते.त्यामुळे थंडीच्या दिवसांत तिळाची चटणी आवर्जून करायला हवी. 

(Image : Google)

साहित्य - 

१. तीळ - १ वाटी 

२. दाणे किंवा सुके खोबरे - अर्धी वाटी 

३. लसूण - १० ते १२ पाकळ्या 

४. मीठ - चवीनुसार 

५. जीरं - अर्धा चमचा 

६. लाल तिखट - अर्धा ते १ चमचा 

७. तेल - अर्धा चमचा 

कृती - 

१. तीळ एका कढईमध्ये मंद आचेवर हलके भाजून घ्यायचे. 

२. त्याच कढईत दाणे किंवा सुके खोबरे खरपूस भाजून घ्यायचे.

३. हे दोन्ही मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्ये जीरे, लसणाच्या पाकळ्या, तिखट आणि मीठ घालून मिक्सर फिरवायचा. 

४. एकदा झाकण उघडून सगळे एकसारखे करुन त्यात अर्धा चमचा तेल घालून पुन्हा एकदा मिक्सर फिरवायचा. 

५. तीळ लसणाची ताजी ताजी चटणी गरम भाकरी, फुलके, पोळी अगदी आमटी-भातासोबतही मस्त लागते.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.