पावसाळा (rainy season) सुरु झाला की वेगवेगळ्या पदार्थांची साठवणूक (store) कशी करायची, हा प्रश्न अनेकींसमोर असतोच. कितीही जपून आणि व्यवस्थित ठेवले तरी अनेक पदार्थांना ओलसरपणा येताे. ते सादळून जातात किंवा पाणी सुटतं. अनेक पदार्थांना एक वेगळाच चिकटपणा येतो. असे ओलसर, दमट पदार्थ खाल्ले जात नाहीत आणि मग वाया जातात. त्यासाठीच बघा या सोप्या ट्रिक्स. चिप्स, बिस्किटं, चिवडा, फरसान किंवा मुरमुरे, काॅफी, मीठ, साखर (food items) हे सगळे पदार्थ राहतील एकदम फ्रेश. (moist free)
पावसाळ्यात पदार्थांना ओलसरपणा येऊ नये म्हणून...१. बिस्किटेहे पदार्थ पावसाळ्यात हमखास खराब होतात. बिस्किटांचा कुरकुरीतपणा तर पार नाहीसा होतो आणि अगदी बोटाने दाबले तरी ते दाबले जातात. अशी बिस्किटं मग चहासोबतच किंवा नुसती खाण्यात काहीच मजा नसते. यासाठी सगळ्यात आधी तर बिस्किटाचा पुडा फोडल्यावर तो लगेच एखाद्या एअरटाईट डब्यात ठेवून द्या. अनेक घरांमध्ये बिस्किट पु्ड्यांमधली सगळी बिस्किटे काढून ती डब्यात टाकली जातात. एरवी ते चांगले आहे. पण पावसाळ्यात असं करू नका. जेवढी पाहिजे तेवढी बिस्किटे काढल्यानंतर बिस्किटाचा पुडा रबर लावून नीट पॅक करा आणि नंतर तो एअर टाईट डब्यात ठेवून द्या.
२. मुरमुरे, चिवडा, फरसाणअसंच मुरमुऱ्याचं आणि चिवड्याचंही करा. पावसाळ्यात ते पाकिटातून काढून एखाद्या डब्यात पुर्णपणे रिकामे करू नका. पाकिटातच ठेवा. शिवाय पाकीट अगदी टोकाला लहानसे फोडा. हवा तेवढा चिवडा- मुरमुरे काढून घेतले की ते पाकीट रबर किंवा क्लिप लावून पॅक करा आणि ते पाकीट मग एअरटाईट डब्यात ठेवा.
३. कॉफी- बोर्नव्हिटाया दोन्ही गोष्टी पावसाळ्यात ओलसर होऊन जातात. इतक्या ओलसर होतात की त्यांच्या बरण्यांची झाकणंही चिकट होऊन जातात. असं होऊ नये यासाठी कॉफी, बोर्नव्हिटा या दोन्ही गोष्टी प्लॅस्टिकच्या डब्यांमधे भरू नका. दोन्ही पदार्थ एअर टाईट डब्यात काढून ठेवा. कॉफीमध्ये थोडे तांदूळ टाकून ठेवा. यामुळेही कॉफी ओलसर होणार नाही. बोर्नव्हिटा किंवा कॉफी यांच्या डब्यांमध्ये एखादा चमचा ठेवायची सवय असेल, तर तसं पावसाळ्यात करू नका. चमच्याने लवकर ओलसरपणा पकडला जातो.
४. मीठ आणि साखरया दोन्ही पदार्थांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत खूपच माॅईश्चर जमा होतं. यासाठी उपाय म्हणजे मीठ आणि साखर काचेच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवण्यापेक्षा एअरटाईट डब्यात ठेवा. काचेच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवायचेच असतील तर त्यासाठी आधी ते पदार्थ झिपलॉक बॅगमध्ये भरा आणि नंतर ही बॅग काचेच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवा. तसेच आणखी एक उपाय म्हणजे मीठामध्ये तांदूळ टाकून ठेवल्यास आणि साखरेमध्ये लवंगा टाकून ठेवल्यास या पदार्थांना ओलसरपणा येत नाही.