भजी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. त्यात आता पावसाळा सुरू झालाय प्रत्येक घरात आलटून पालटून भजीचा बेत असतोच. पावसाळ्यात चहासह भजी खाण्याचा आनंद काही वेगळाच. पण अनेक महिलांची तक्रार असते की भजी हवी तशी फुगत नाही. तळल्यानंतर काही सेकंद फक्त कुरकुरीतपणा राहतो. पण त्यानंतर लगेच नरम पडते. तुम्हालाही कोणत्या प्रकारच्या भजी बनवताना अशा प्रकारच्या अडचणी येत असतील तर आज आम्ही तुम्हाल खमंग, कुरकुरीत भजीची रेसीपी सांगणार आहोत. अशी भजी खाऊन तुम्ही आणि घरातही मंडळीही तुमच्यावर तुफान खुश होतील.
बटाट्याच्या भजीसाठी लागणारे साहित्य
2 बटाटे
2 कप पाणी
1/2 कप बेसन पीठ
1/2 चमचा लाल तिखट
1/4 चमचे हळद
चवीनुसार मीठ
मूठभर ताजी कोथिंबीर
तळण्यासाठी तेल
4-5 हिरव्या मिरच्या
चिमुटभर ओवा
कृती
बटाटे सोलून धुवून घ्या. नंतर बटाटे चांगले पातळ काप मिळण्यासाठी चिरून घ्या मग हे काप पाण्यात ठेवा.
एका वाटीत बेसन पीठ, हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, चिमुटभर ओवा घाला. पीठ ओलसर तयार करण्यासाठी थोडेसे पाणी घाला. पिठ फार जाड किंवा फार पातळ नसावे. ते मध्यम असावे. म्हणून सुरूवातीपासूच हळूहळू पाणी घाला, आधीच जास्त पाणी घातल्यास पीठ जास्त पातळ होऊ शकतं.
नंतर टिश्यू पेपरवर किंवा स्वयंपाकघरातील स्वच्छ कापडावरील सर्व बटाट्याचे तुकडे आणि कापांमधून जास्तीचे पाणी पुसून टाका. मग तळण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा. आता बटाट्याचे तुकडे पिठात घोळवून घ्या आणि त्याला गरम तेलात तळा.
भजी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा आणि जास्तीचं तेल काढून टाकण्यासाठी त्यांना स्वच्छ टिशू पेपरवर ठेवा. त्याच प्रकारे उरलेले बटाट्याचे काप तळून घ्या. आता तुम्ही मिरच्या भज्या त्याच पीठात घोळवून कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करू शकता.
कुरकुरीत भजीसाठी महत्वाच्या टिप्स
१) बटाटा नेहमी पातळ कापावा. त्यामुळे भजी आणखी चविष्ट होतात.
२) बटाटा पातळ चिरताना तो खूप वेळ पाण्यात ठेवू नका.
३) बटाटा भजीसाठी बेसनचे भिजवलेले पीठ नेहमी घट्ट हवे. म्हणजे बटाट्याच्या कापाला ते बेसन पूर्ण लागले. जर पीठ पातळ असेल तर भजीला व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे फक्त बटाटे तळून काढल्यासारखं वाटू शकतं. म्हणून आधीच काळजी घ्या
४) भजी कुरकुरीत हवी असेल तर पिठामध्ये अगदी किंचितसा सोडा, तांदळाचं किंवा मक्याचं पीठ घाला. पण या पिठाचं प्रमाण अगदी कमी असायला हवं.